रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिला पळाल्या:केअरटेकर महिलेला मारहाण करून हातपाय बांधून पलायन, 20 दिवसांनीही शोध नाही
![]()
पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता. पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित दहा महिला अजूनही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या सर्व महिला २३ ते ३३ वयोगटातील आहेत. या महिलांना शहरातील विविध ठिकाणी वेश्याव्यवसायावर केलेल्या कारवाईतून वाचवण्यात आले होते. दिघी, फरासखाना, देहूरोड, जेजुरी आणि कोंढवा पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईनंतर त्यांना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये आश्रय देण्यात आला होता. न्यायालयाने १८ मार्च रोजी या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असतानाच, फाऊंडेशनच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. २३ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता एका बांगलादेशी महिलेने पोटदुखीचे नाटक करत महिला केअरटेकरला औषध मागण्यासाठी बोलावले. औषध देण्यासाठी आलेल्या केअरटेकरवर तिने मैत्रिणीच्या मदतीने झडप घातली. तिचे तोंड दाबून, हात-पाय बांधले आणि त्यानंतर सर्व महिलांनी मिळून मुख्य गेटचे कुलूप उघडून पळ काढला. रेस्क्यू फाउंडेशनकडून वारंवार पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती, परंतु ती पुरवण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून, यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
