जिल्हा रुग्णालयात मोफत फिजिओथेरपी:दरमहा होणारा 15 हजारांचा खर्च वाचेल, ऑगस्टपासून कॅन्सरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष
.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आता कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे उपचार प्रत्यक्षात सुरू होणार असून, यासाठी १० बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी होणारा १० ते १५ हजार रुपयांचा मासिक खर्च वाचणार आहे.
सध्या जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी ३ ते ४ हजार नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद होत आहे. शस्त्रक्रिया किंवा रेडिएशननंतर रुग्णांचे हात-पाय आखडणे किंवा शरीराला सूज येणे यांसारखे त्रास उद्भवतात. अशा वेळी ३ ते ६ महिने फिजिओथेरपी आवश्यक असते. खासगी रुग्णालयात एका थेरपीसाठी ५०० ते १ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, आता जिल्हा रुग्णालयात १० बेडच्या स्वतंत्र कक्षात हे उपचार मोफत मिळणार असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. महिनाभराचा हा खर्च १५ हजारांच्या घरात जातो. आता जिल्हा रुग्णालयात ही सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या सुविधेचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मुंबईतील नामांकित टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या स्वतंत्र कक्षात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनसह अतिदक्षता विभागाचीही सोय करण्यात येणार आहे. यामुळे गुंतागुंतीच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळतील.
^जिल्हा शासकीय रुग्णालयात आता फिजिओथेरपीची आधुनिक सुविधा मोफत दिली जाणार आहे. यासाठी लागणारा औषध साठा सरकारने उपलब्ध करून दिला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. — डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर.
फिजिओथेरपी का आहे महत्त्वाची? . शारीरिक हालचाल : ऑपरेशननंतर आखडलेले हात-पाय मोकळे करण्यासाठी उपयुक्त. . वेदनामुक्ती : शरीराची सूज आणि वेदना कमी होऊन रुग्ण पुन्हा स्वावलंबी होतो. . पुनर्वसन : केवळ औषधोपचार नाही, तर रुग्णाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
तज्ज्ञांना मिळणार “टाटा’चे धडे
