20 अपघातग्रस्तांच्या वारसांना 40 लाख:ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही
![]()
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतून मयत शेतकऱ्याच्या पत्नीला दोन लाख अनुदान मंजुरीचे पत्र देतांना इगतपुरी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी किशोर भरते. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत केली जाते. अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यास वारसांनी या योजनेसाठी ३० दिवसांच्या आत प्रकरणे सादर करणे गरजेचे आहे. प्रतिनिधी | इगतपुरी महाराष्ट्र शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतंर्गत तालुक्यातील २० अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना ४० लाखांचा निधी खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, इगतपुरी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हे धनादेश वितरीत करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधून कृषी विभागामार्फत उपकृषी अधिकारी यांचेकडून सर्वतोपरी मदत केली जाते. अपघातग्रस्तांच्या वारसांना २ लाखांचे अनुदान मिळाल्यावर कृषी विभागाचा एक कर्मचारी म्हणून निश्चितच समाधान लाभते. शासनाकडून ही योजना ऑनलाईन राबवली जात असल्याने शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही, असे उपकृषी अधिकारी किशोर भरते यांनी सांगितले.
