महात्मा फुले यांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी:महात्मा फुले यांच्या मानवतावादी विचारांना व्यापक स्तरावर पोहचवा- प्रा. श्रीकृष्ण बनसोड
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोषाने अंबानगरी अक्षरशः दुमदुमली. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांच्या शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विविध संघटना, महिला आणि समाजबांधवांनी एकत्र येत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होत वातावरण भारावून गेले. ‘उपेक्षित समाज महासंघा’तर्फे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंधचे रामकुमार खैरे, वसंत भडके, बुद्धधम्म प्रचारक धम्मपाल रामटेके, संभाजी ब्रिगेडचे संजय ठाकरे, गुणवंत राऊत, इंजि. अरविंद गावंडे, डॉ. नरेशचंद्र काठोळे, डॉ. उज्ज्वला सुरेश मेहरे, गणेश मानकर, इंजि. सुभाष गोहत्रे, प्रवीण नेवारे, सुभाष चौधरी, प्रा. रिजवी, पंकज टवलारे, ज्ञानेश्वर कुर्वे, सुभाष खंडारे, सुभाष शिंदे, उत्तमराव भैसने, विनोद बोबडे, ओम नेवारे आदी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील समता सैनिक उपस्थित होते. तसेच सिता चौधरी, समीक्षा नेवारे, पूजा चौधरी, रोशनी चौधरी, मालती रविंद्र पाटील या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेकींनी गुलाबपुष्प अर्पण करून क्रांतीज्योती महात्मा फुले यांना अभिवादन केले. या प्रसंगी डॉ. प्रविण बनसोड लिखित ‘विचारपुष्प’ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या क्रांतिकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “महात्मा फुले यांच्या मानवतावादी विचारांना देश व जातींचे परीघ तोडून व्यापक स्तरावर पोहोचविण्याची गरज आहे. त्यांच्या सत्यशोधकीय व बुद्धीप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानाची प्रत्येकाच्या मनामनांत पेरणी करून ते आचरणात आणणे अत्यावश्यक आहे. त्यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय्य हक्कांसाठी लढा दिला. त्यामुळे जातीय व धार्मिक विषमता नाकारून ‘माणूस तितुका एक’ हा विश्वबंधुत्वाचा विचार संपूर्ण मानवजातीसाठी अनिवार्य ठरतो. श्रीकृष्ण माहोरे यांनी आपल्या भाषणात फुले दाम्पत्याने सर्व जाती-धर्मातील मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिल्याचे अधोरेखित केले. या कार्यक्रमाला सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गोविंद फसाटे यांनी दिली. प्रतिनिधी | अमरावती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ११) महानगरपालिकेत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता नाना आमले, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता आवारे, शिक्षण समिती उपसभापती वंदना मडघे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर चित्रा चौक येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासही महापौर तेजवाणी यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके तसेच अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
