नदी सुशोभीकरणात पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्या – पंकजा मुंडे:पुणे येथे मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा आढावा
![]()
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उपायांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समितीचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुंडे यांनी यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात, परंतु योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात, असे मुंडे यांनी निदर्शनास आणले. पुणे शहरातील सर्व सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जातील आणि त्याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुंडे म्हणाल्या. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा आणि विभागांचा अभ्यास करून नवीन धोरण आणले जाईल. तसेच, बारामती येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्न करण्यासोबतच, शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी महानगरपालिका हद्दीत निर्माण होणारे मैलापाणी व प्रक्रिया क्षमता, अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्या व कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती आणि प्रकल्पातील अडथळे यावर प्रकाश टाकला. वारजे, वडगाव, मुंढवा, मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची सविस्तर माहितीही सादर करण्यात आली.
