मागाठाणे ते गोरेगाव कनेक्टिव्हिटी वाढणार:कांदिवलीत 120 फूट डीपी रोडचे उद्घाटन, 95 टक्के रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण
![]()
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २६, कांदिवली (पूर्व) येथील सिंग इस्टेट – ठाकूर व्हिलेज परिसरातील मागाठाणे ते गोरगाव यांना जोडणाऱ्या १२० फूट रुंदीच्या विशेष पायाभूत डीपी रोड प्रकल्पाचे उद्घाटन आज दुपारी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे साडेतीनशे घरे बाधित झाली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून, बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आमदार सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेले नागरिक आता इतर ठिकाणी पुनर्स्थापित झाले असून, शासनाच्या विकासकामांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतूनच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ९५ टक्के रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. … तोपर्यंत रस्त्याचे लोकार्पण नाही – प्रकाश सुर्वे यावेळी बोलताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत उर्वरित १०० टक्के रहिवाशांचे त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी समाधानकारक पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत रस्ता पूर्ण झाला तरी त्याचे लोकार्पण करण्यात येणार नाही.” या कार्यक्रमाला शाखाप्रमुख सचिन केळकर, महिला शाखाप्रमुख हेमलता नायडू, सिंग इस्टेट रहिवासी संघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
