दर्यापुरला रुग्णालय, वडनेर गंगाई, येवद्याला पुरवा आरोग्य सुविधा:खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
![]()
दर्यापुर येथे ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशी सूचना करतानाच येवदा व वडनेर गांगाईला अधिक आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी सूचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. डॉ. बोंडे यांनी आज, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर व विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही सूचना केली. त्यांच्यामते दर्यापुर तालुका हा शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक संवर्गामध्ये येत असल्याने त्या तालुक्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर दिला जावा. येवदा, वडनेर गंगाई येथील रूग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्यांचे सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. तपासणीची सुविधा त्याच ठिकाणी उभी झाल्यास रुग्णांची गैरसोय टळेल आणि जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीलाही वेग येईल. डॉ. बोंडे यांनी यावेळी विविध विकासकामांची माहितीही जाणून घेतली. यंत्रणांनी लोकाभिमुख कामे करताना आपले उत्तरदायित्व पाळावे. शासनाची प्रतीमा मलीन होणार नाही, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व सुविधा पुरवाव्या अशा सूचना केल्या. गरजूंना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम आखावी, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपून सत्ता स्थापन झाल्यानंतर ठिकठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १४ प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, याची खात्रीही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळवून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. या वेळी विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आजच्या बैठकीत विविध विषयांना हात घातला. परंतु त्यातील अधिक चर्चा ही केंद्र सरकारच्या नमो उद्यान, वड उद्यानावर केंद्रीत झाली होती. वन विभागातर्फे जिल्ह्यात नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना त्याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी, हेही त्यांनी निक्षूण सांगितले.
