नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:2090 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक होतील की काय? पुण्यातील आयटी कंपन्यांचेही ऑडिट करा- गोपीचंद पडळकर
![]()
नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये जो प्रकार घडला तो इतर कंपन्यामध्ये घडतो का याकडे लक्ष दिले पाहिजे. नाशिक हे काय आयटी हब नाही. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या घटनेनंतर कुठे असे प्रकार घडत आहेत का याचा शोध घेतला पाहिजे, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. नाव बदलून मुलींना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. नाशिकमध्येही एका मुलाचे धर्मांतर झाल्याची माहिती समोर येत आहे. हे अत्यंत गंभीर आहे. 2027 च्या जनगणनेनंतरची आकडेवारी धक्कादायक असेल. 2090 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक होतील की काय, अशी भीती वाटत आहे. काश्मीरमध्येही 100 वर्षांपूर्वी हेच घडले होते, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर भाष्य केले आहे. कंपनीमध्ये जिहादी लोक आहेत का? गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुलींच्या कुटुंबियांनी मतुली जॉबसाठी कुठे जातात? त्या ट्रिपला कोणासोबत जातात या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. नाशिक प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. त्यांचे या गोष्टीकडे लक्ष आहे. कंपनीमध्ये जिहादी लोक आहेत का? त्यांची डिग्री खरी आहे का? हे देखील तपासले पाहिजे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे हिंदू आहेत त्यांनी याकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे. हा काही राजकीय मुद्दा नाही असेही त्यांनी बोलाताना म्हटले आहे. एचआर विभागाची सुद्धा चौकशी व्हावी गोपीचंद पडळकर म्हणाले की, ज्यांना भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणायचे नाही, अशा विशिष्ट मानसिकतेच्या लोकांकडून हे कृत्य केले जात आहे. नाशिक प्रकरणात कंपनीच्या एचआर विभागाला या कृत्यांची माहिती होती का? त्यांनी दुर्लक्ष केले की सहकार्य केले? याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी बारकाईने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी आयटी कंपनीची एचआर हेड अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पाच संशयित आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शफी शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गुन्ह्यातील संशयित दानिश न्यायालयीन कोठडीत आहे.
