अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा
![]()
सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक बॉक्सचा आहे. सुळे यांनी सांगितले की, दादांचा मोबाईल फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्सबाबत ठोस माहिती का दिली जात नाही? सुरुवातीला ब्लॅक बॉक्स मिळाला नसल्याचे सांगितले गेले, नंतर तो सापडल्याची माहिती देण्यात आली, तर काही काळाने तो जळाल्याची चर्चा पसरली. या सर्व विरोधाभासी माहितीमुळे तपासाची विश्वासार्हता कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आमच्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग आला आहे, पण भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणात अद्याप महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला नसल्यानेही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याच मुद्द्यावर रोहित पवार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे समोर आणले होते. तसेच या प्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर न आल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या सुळे यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केले. त्यांनी राज्य सरकारने हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित करावे, महिला अत्याचार रोखण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणी केली. तसेच राज्यातील अलीकडील घटनांवरून समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक खरात प्रकरणामुळे दिल्लीतही चेष्टा अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे, असे त्या म्हणाल्या. या घटनांमुळे दिल्लीतही आपली चेष्टा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्या विधानांवरही प्रतिक्रिया
याशिवाय, राहुल गांधी यांच्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी केलेली भाकिते खरी ठरत असल्याचे सुळे म्हणाल्या. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी निर्भयपणे भूमिका मांडतात, त्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जाते, असा आरोप करत त्यांनी भाजपवरही टीका केली.
