इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही का?:शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावर तुषार भोसलेंचा पलटवार
![]()
वारकरी संप्रदायाबाबत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते. तसेच, या प्रबोधनाच्या परंपरेत महिलांचा सहभाग कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. पवारांच्या या विधानानंतर भाजपने तात्काळ आक्रमक भूमिका घेत टीकेची झोड उठवली. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत पवारांवर हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की, हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाबद्दल नकारात्मक भूमिका घेणाऱ्या पवारांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही, पण राम कृष्ण हरीचा गजर करणाऱ्या वारकरी परंपरेवर टीका केली जाते, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तुषार भोसले यांनी पुढे असेही म्हटले की, वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचा संदेश देणारा आहे आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही लोकांची यादी तयार करून त्यातून संप्रदायाला विभाजित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, अशा कोणत्याही प्रयत्नांना आपण जिवंत असताना यश मिळू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही पवारांच्या विधानावर टीका केली. त्यांनी म्हटले की, वारकरी संप्रदायात धर्मांध शक्ती नाहीत, उलट काही अर्बन नक्षलवादी घटक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाबतीत पवारांनी आपल्या संशोधन पथकाद्वारे स्पष्ट माहिती द्यावी, असे आव्हान त्यांनी केले. विठ्ठल भक्ती आणि प्रबोधनाला धर्मांधतेशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या वादात विश्व वारकरी सेनेनेही उडी घेत पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला. विश्व वारकरी सेनेचे हभप गणेश महाराज शेटे यांनी म्हटले की, वारकरी संप्रदायाने नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्व धर्मांना समानतेने वागवण्याचे काम केले आहे. मात्र, हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला वारकरी समाज विरोध करणारच. नाशिकमधील खरात प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा घटनांचा सर्व वारकऱ्यांनी निषेध केला आहे. वारकरी परंपरा ही सनातन धर्माचा भाग- गणेश महाराज शेटे शेटे यांनी पुढे सांगितले की, संप्रदायात राजकारण करण्याचा हेतू नसला तरी काही सामाजिक मुद्द्यांवर भूमिका घेणे गरजेचे असते. लव्ह जिहादसारख्या प्रकरणांविरोधात जनजागृती करण्यासाठी जर एखादा राजकीय पक्ष पुढे येत असेल, तर त्याला समर्थन देण्यास कीर्तनकार तयार असतात. वारकरी परंपरा ही सनातन धर्माचा भाग असून ती योग्य मार्गानेच पुढे जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वाद अधिक चिघळण्याची शक्यता दरम्यान, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनीही पवारांवर टीका करत त्यांचे वक्तव्य वास्तवाशी विसंगत असल्याचे म्हटले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, पवारांनी कीर्तनकारांची यादी जाहीर करावी, जेणेकरून कोणाला बोलवायचे आणि कोणाला टाळायचे हे स्पष्ट होईल. या सर्व घडामोडींमुळे वारकरी संप्रदाय, राजकारण आणि समाज यांच्यातील नात्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
