बेपत्ता मुलीच्या शोधत गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या:बीडहून पुण्याला तपास करायला गेले, मध्यरात्री घरी येताच उचलले टोकाचे पाऊल
![]()
राज्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. त्यात खून, खंडणी तसेच मुली बेपत्ता होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत देखील मांडला होता. आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 35 वर्षीय पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुणे येथे गेलेले जायभाये हे संबंधित तपास आणि काम व्यवस्थित पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतले होते. मात्र त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी ही आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यावरून तपास पूर्ण करून परतल्यानंतर अवघ्या काही वेळातच, पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यात नेमके काय झाले? बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधात गेलेले पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांच्यासोबत पुण्यात नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. आता पोलिसांनी बाळकृष्ण जायभाये यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरम्यान, बीड जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या मुलीचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वी झाला होता आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने ती सासरी वास्तव्यास होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली असून या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिस अधिक तपास करत आहेत.
