विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज- डॉ. रघुनाथ माशेलकर:शिक्षण प्रसारक मंडळीच्या 'सहनिर्मिती' कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

0
63aadbf8-6765-474a-bc13-bb35a6e22cc7_1777465646079.jpg




प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित ‘भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात ‘भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती’ या संकल्पनेवर आधारित नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. माशेलकर यांनी बदलत्या काळात नेतृत्वाची भूमिका आणि नवोन्मेषाची गरज यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार आणि नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. माशेलकर पुढे म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी सक्षम करण्याची गरज आहे. शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बनणे आवश्यक आहे. त्यांनी पारंपरिक शिक्षक-केंद्रित पद्धतीऐवजी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षकांनी ‘प्रेझेंटर’ न राहता ‘फॅसिलिटेटर’ची भूमिका स्वीकारावी, असेही ते म्हणाले. एकसारख्या शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षणावर भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ सुधारणा नव्हे, तर क्रांतिकारी बदल घडवणारे नेतृत्व आवश्यक आहे. समस्यांमध्ये संधी शोधणे, धाडसी कल्पनांवर विश्वास ठेवणे आणि मोठी ध्येये ठेवणे ही नवोपक्रमी नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण प्रणालीत निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे, पाठांतरातून समजून घेण्याकडे आणि अवलंबित्वातून स्वावलंबनाकडे जाण्याची गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांचा परस्पर संबंध मजबूत करणे आवश्यक आहे. आजच्या काळात केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण पुरेसे नसून, विद्यार्थ्यांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता यांसारखी कौशल्ये विकसित करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. माशेलकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed