पाकिस्तानातून बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा नागपूरमध्ये पर्दाफाश:मुंबईमार्गे पुरवठ्याचा संशय; 15 हजारांचा माल जप्त

0
85cacd70-75ac-41ce-b07d-364fd966c8ae_1777467949976.jpg




नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. मुंबईमार्गे नागपूरमध्ये आलेल्या या मालाची किंमत सुमारे 15,186 रुपये आहे. इतवारी परिसरातील मे. साईबाबा ट्रेडर्स, कासारपुरा गल्ली येथे पथकाने छापा टाकला. या छाप्यात “मेड इन पाकिस्तान” असे लेबल असलेली विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवलेली आढळली. जप्त केलेल्या मालामध्ये गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड प्लस, गोल्डन स्टार ब्युटी क्रीम, गोरी व्हाइटनिंग बॉडी लोशन आणि गोरी व्हाइटनिंग सोप या उत्पादनांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान, या उत्पादनांवर आयात नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादन आणि कालबाह्यता दिनांक तसेच घटक यांची कोणतीही माहिती नमूद नव्हती. तसेच, खरेदीसंदर्भात कोणतीही अधिकृत बिले किंवा नोंदी उपलब्ध नव्हत्या. काही उत्पादनांवर तर उत्पादकाचे नावही नव्हते. प्राथमिक तपासानुसार, ही उत्पादने पाकिस्तानातून बेकायदेशीररीत्या आयात करून मुंबईमार्गे नागपूरमध्ये आणण्यात आल्याचा संशय आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा आणि स्टिरॉइड्ससारखे घातक घटक असण्याची शक्यता असून, ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेल्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून, पुरवठा साखळीचा सखोल तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अशा संशयास्पद व बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांची खरेदी व वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed