हिंगोलीच्या पालकमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार:क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रदिनी नरहरी झिरवाळांना दाखवणार काळे झेंडे

0
new-project-2026-04-30t124159291_1777534029.jpg




हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दीडवर्षापेक्षा अधिक काळ काम पाहणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना त्यांच्या खात्याचे कार्यालय हिंगोलीत सुरु करता आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता विकासाची आपेक्षाच नाही. यामुळे निष्क्रीय पालकमंत्री म्हणून त्यांना शुक्रवारी ता. १ क्रांतीकारी शेतकरी संघटना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिली आहे. या संदर्भात कावरखे यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात महत्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या कुठल्याच प्रश्‍नांची सोडवणूक झाली नाही. पिकविमा मिळालेला नाही. पिकविम्यासाठी वारंवार आंदोलन केल्यानंतरही विम्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. शेतकऱ्यांना पिककर्ज देतांना बँकांकडून तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. मात्र पालकमंत्री झिरवाळ व इतर लोकप्रतिनिधी केवळ वाताणूकुलीत कक्षात बसून बैठका घेऊन सुचना देतात अन नेहमी प्रमाणे बँका त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतरही बँकेवर कारवाई होत नाही हे जिल्हयाचे दुर्देव आहे. हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून किती निधी येतो त्यातून कोणती कामे घेतली जातात याची माहितीही कोणाला दिली जात नाही. केवळ ऑनलाईन बैठका घेऊन आर्थिक लाभ पदरात पाडून घेतला जात असल्याचा आरोप कावरखे यांनी केला आहे. जिल्हा नियोजनची एकही बैठक प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पालकमंत्री केवळ कंत्राटदारांचे भले करण्यासाठी काम करतात काय असे वाटणे स्वाभाविक आहे. दरम्यान , पालकमंत्री ज्या अन्न व औषध विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाचे कार्यालय देखील हिंगोलीत सुरु करता आले नाही. या कार्यालयाचे कामकाज अद्यापही परभणी जिल्ह्यातूनच सुरु आहे. स्वतःच्या खात्याचे कार्यालय हिंगोलीत सुरु न करता येणाऱ्या पालकमंत्री झिरवळांकडून जिल्ह्याच्या विकासाची तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची काय अपेक्षा ठेवणार? असा सवाल कावरखे यांनी उपस्थित केला आहे. हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून निष्क्रीय ठरलेल्या झिरवाळांना क्रांतीकारी शेतकरी संघटना शुक्रवारी ता. १ मे रोजी काळे झेंडे दाखविणार असल्याचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *