बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार:राहुरीतून चौघांचे अर्ज मागे; डीसीएम सुनेत्रा पवारांच्या विरोधात कॉंग्रेस ठाम
![]()
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता या मतदारसंघात निवडणूक होणे जवळपास निश्चित झाले आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान, आज बारामतीमधून 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातूनही 4 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली असून, उद्या शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात आणखी काय नाट्य घडते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याने आजची अंतिम आकडेवारी स्पष्ट होण्यास काहीसा वेळ लागणार आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कॉंग्रेस ठाम या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले असून, काँग्रेसने आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 18 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बारामतीत काँग्रेसने माघार न घेण्याचा पवित्रा घेतल्याने येथील लढत तिरंगी किंवा चुरशीची होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून चौघांची माघार दरम्यान, अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 18 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. उद्या गुरुवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले दोन अपक्ष अर्ज आणि शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
