मानखुर्दमधील 1200 अनधिकृत बांधकामावर हातोडा:11 एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त, मंत्री लोढा यांनी केला होता पाठपुरावा
![]()
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल बाराशे झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी ‘विज्ञान पार्क ‘ उभारण्यात येणार आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून त्यातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पडताळणी करून सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असे उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मानखुर्द येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. पोलिस उपायुक्त समीर शेख, अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे पद्माकर रोकडे यांच्यासह पूर्व उपनगरातील अतिक्रमण निष्कासन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह ४०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. ११ एकर शासकीय जमीन मोकळी या मोहिमेद्वारे आतापर्यंत १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून, ११ एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. मोकळ्या केलेल्या जागेवर परत अतिक्रमण होऊ नये या करिता संरक्षक भिंत बांधण्यात येत असून, अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील – लोढा मुंबई महापालिकेच्या उपनगर अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने केलेल्या कारवाईबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सह पालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. मालाड आणि मालवणी परिसरातही कारवाई सुरू – लोढा मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे करून मोकळ्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यातूनच अनेकदा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही स्थानिक नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा गोरखधंदा तसेच समाजविघातक कृत्याला खतपाणी मिळत असते. मालाड आणि मालवणी परिसरातही सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निदर्शनाला आली असून तिथे ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली. अतिक्रमणमुक्त जमिनीवर विधायक उपक्रम राबवणार मुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमण मुक्त ५०० एकर जमिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवणार आहोत, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मानखुर्द येथील सध्या अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने अत्याधुनिक ‘विज्ञान पार्क’ उभारणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
