तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिव्यांग बांधवांचा मोर्चा; पोलिसांचा बंदोबस्त तैनात
![]()
दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. ‘तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला असून, मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही या मागणीचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा धडाका लावला असून, मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले. यापूर्वीच गेल्या आठवड्यात तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकांना महत्त्वाच्या मोक्याच्या जागांवर तर काहींना महामंडळे व प्राधिकरणांवर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली असून, या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या लोकहितवादी निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आदराची भावना असून, ही बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, मुंढे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग विभागातच कायम ठेवण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, नानादेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले होते. दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
