फेकनरेटिव्हमुळे 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचे मोठे नुकसान:कार्यकर्त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहावे – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
![]()
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्याचे आवाहन केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘फेकनरेटिव्ह’मुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सक्रियपणे काम करणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले. पुण्यात भाजप वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात पक्षाचे सध्या दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहेत. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथमध्ये ५१ टक्के संघटना वाढवण्याचे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री शिव प्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप गटनेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी पुणे शहराची देशात एक वेगळी ओळख असून ती प्रभावीपणे पुढे नेणे हे आपले काम असल्याचे सांगितले. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शिस्तप्रिय असावा आणि पक्षाच्या स्थापनेच्या मूळ गाभ्याशी व विचारधारेला समर्पित असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे, असेही ते म्हणाले. भाजपची मागील ४६ वर्षे ही समर्पणाची असून, अनेक जणांनी अपार कष्ट करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याग केला आहे. देशाला परम वैभव प्राप्त झाले पाहिजे, त्या दिशेने नेण्याची जबाबदारी केवळ भाजपची आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी धीरज घाटे यांनी पुण्यात भाजपचे काम झपाट्याने वाढत असून, विविध निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांचे संघटन आणि तळागाळात पोहोचलेले पक्षाचे विचार यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळत आहे. कार्यकर्ता विचारधारेच्या आधारे काम करतो आणि सामान्य पुणेकरांना डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे, असे घाटे म्हणाले.
