पैठण येथे अधिक मासानिमित्त अखंडहरिनाम सप्ताह; नाथभक्त मंत्रमुग्ध:विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सेवा गौरव सोहळा
![]()
प्रतिनिधी | पैठण येथील नाथ समाधी मंदिरात अधिक मासानिमित्त परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. दररोजच्या धार्मिक कार्यक्रमांना नाथभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरित्र कथेच्या श्रवणाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. नाथ मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सेवा गौरव पुरस्कार सन्मान सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यास त्रयमूर्ती म्हणून श्रीमद जगद्गुरू सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती शंकराचार्य महास्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शंकरभारती महास्वामी महाराज, महंत प्रमोद महाराज जगताप, अमृताश्रम स्वामी महाराज, संस्थानाधिपती गुरू रावसाहेब महाराज गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रफुल्लबुवा तळेगावकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून विनीत महाराज गोसावी उपस्थित होते. या वेळी वारकरी, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. समाजसेवक, वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ही माहिती नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी यांनी दिली. या सोहळ्यात विविध संतमहंत सहभागी होणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण महाराज गोसावी, राघव महाराज गोसावी, मनवा पुष्कर गोसावी, सुप्रिया गोसावी, गणेश चिंधे, वेदमूर्ती विशाल शास्त्री दाणी, ओंकार दाणी, सुधीर शास्त्री पैठणकर, संजय साळुंके, वेदिका गोसावी, भास्कर महाराज ओक, काशिनाथ महाराज जवंजाळ, ज्योतिराम महाराज घाडगे, गोवर्धन छडीदार परिश्रम घेत आहेत. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अखंड हरिनाम सप्ताहात दररोज विष्णुसहस्रनाम पठण, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आणि प्रवचनाची सेवा होते. नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी श्रीसंत एकनाथ महाराज चरित्र कथेचे निरूपण करत आहेत. प्रवचनकार, कीर्तनकारांची सेवा सुरू आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन संस्थानाधिपती श्रीगुरू रावसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.
