मुंबईकरांचा प्रवास सुसाट!:दहिसर-काशिगाव मेट्रोचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; मिरा-भाईंदरच्या 'त्या' वादग्रस्त उड्डाणपुलावरही दिले स्पष्टीकरण

0
db-temp-cover-marathi-2026-04-07t190633128_1775568982.jpg




राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गाला लागून उभारण्यात आलेल्या एका उड्डाणपुलावरून मोठा वाद उफाळून आला होता. सुरुवातीला चार मार्गिकांचा (लेन) असलेला हा पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांचा होतो. या सदोष रचनेमुळे भविष्यात या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी एमएमआरडीएच्या (MMRDA) कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला होता. अर्धवट कामावरून वाद नको – मुख्यमंत्री या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले. नागरिकांच्या रोषाची दखल घेत त्यांनी स्पष्ट केले की, हा पूल अत्यंत गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात उभारण्यात येत आहे. तेथे पूल बांधण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही, हे वास्तव सर्वांना माहीत आहे. पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच त्याचे अर्धवट फोटो काढून विनाकारण वाद निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर आपण एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या नागरिकांनी केवळ पुलाचे अर्धवट डिझाईन पाहिले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे खूप मोठे बदल होतील असा कोणताही दावा आपण करणार नाही, कारण जागेची मोठी अडचण आहे. परंतु, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त चांगला वापर करून या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दहिसर-काशिगाव मेट्रो बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत मुंबईकरांची दैनंदिन वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. याच शृंखलेत आता दहिसर पूर्व ते काशिगाव या नव्या मार्गाची भर पडली आहे. या नव्या मार्गाच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगरात आता कार्यान्वित असलेल्या मेट्रो कॉरिडॉर्सची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. यामध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा (मार्ग १), अंधेरी पश्चिम-दहिसर पूर्व (मार्ग २ अ), दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मार्ग ७) आणि कुलाबा ते बीकेसी-सीप्झ (मार्ग ३- अ‍ॅक्वा लाईन) या आधीपासूनच सुरू असलेल्या मार्गांसोबत आता ‘मेट्रो ९’ जोडली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed