भीमाशंकर मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद:कुंभमेळा पार्श्वभूमी, भाविकांची सुरक्षितता, जूनमधील पावसाचे प्रमाण आणि बांधकाम कामांमुळे निर्णय
![]()
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनासाठी ९ एप्रिल २०२६ पासून ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची पार्श्वभूमी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण आणि मंदिर परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या सुरू आहेत. कुंभमेळ्यावेळी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होणारी गर्दी लक्षात घेता, जुना सभामंडप अपुरा पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. पायरी मार्गाचे कामही सुरू आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्णतः उतरवून नवीन सभामंडपाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकाम साहित्य, मोठे दगड आणि अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात असल्याने, चालू कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या विचारात घेता, बांधकाम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. सभामंडपाचे सुमारे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम सुरू आहे. तसेच, मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे कामही प्रगतीत असून प्रवेशमार्ग पूर्णतः बंद आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे सध्या विकास कामांना गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
