एसटी प्रवासादरम्यान शेजारील प्रवाशांना बोलून विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना गुंगीकारक गोळ्या खायला देउन लुट करणार्‍या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची सोन्याची लगड, गुंगीच्या गोळ्यांची दोन पाकिटे असा ऐवज जप्त केला आहे. बाबू भुरेखान ( ६३ रा. मंदसौर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचे वडील बोरवली ते स्वारगेट असा शिवशाही बसने प्रवास करत होते. त्यांना आरोपीने संजय अगरवाल असे खोटे नाव सांगितले . त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर त्याने विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने गुंगीकारक गोळी खायला देउन, हातातील १० ग्रॅम सोन्याची अंगठी चोरुन नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिवशाही बसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासाला गती दिली. गुन्ह्यातील आरोपी हा मध्यप्रदेशातील असून, तो सराईत बाबू भुरेखान असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो महाकाल उज्जैन परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी बाबूला उज्जैनमधून अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, पोलीस निरीक्षक प्रदीप सोदे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके, उपनिरीक्षक बाळू शिरसट, अंमलदार प्रदीप शिंदे, किरण रघतवान, नितीन क्षीरसागर, रमेश चव्हाण, अक्षय भोगे, युवराज राठोड, सोमनाथ बटुळे, किरण ढापकर, रोहित पवार यांनी केली.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search