जि.प.च्या नवे सीईओ सत्यम गांधींनी सूत्रे स्वीकारली:कॅन्टीनमध्ये पराठा-मठ्ठा घेऊन 100 रुपये बिल ऑनलाइन भरले
![]()
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच, कॅन्टीनमध्ये पराठा आणि मठ्ठा घेऊन त्याचे बिल ऑनलाइन भरल्याने त्यांच्या कार्यशैलीची चर्चा सुरू आहे. सीईओ गांधी यांनी अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ‘वैदर्भी’ या जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनला भेट दिली. तिथे त्यांनी पराठा आणि मठ्ठा घेतला आणि ऑनलाइन पद्धतीने शंभर रुपयांचे बिल अदा केले. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागांची पाहणी करून कॅन्टीनमधील पदार्थांची चव घेणारे सत्यम गांधी हे पहिले सीईओ ठरले आहेत. २०२१ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले गांधी यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव आहे. पाहणीदरम्यान, त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन विभागप्रमुखांचे दालन, त्यांची उपस्थिती, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि सामान्यांना विभागप्रमुखांची ओळख व्हावी यासाठी नेमप्लेटची अनिवार्यता यावर भर दिला. बांधकाम उपविभागातील एक विभागप्रमुख अनुपस्थित आढळल्याने त्यांनी लगेच त्यांच्या दौऱ्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे की नाही, याची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी आणि स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे उपस्थित होते. प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांशी बोलताना सीईओंनी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती घेतली. काही कर्मचाऱ्यांशी, विशेषतः आयटीशी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शासनाच्या ई-गव्हर्नन्ससाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची एकप्रकारे पडताळणी केली.
