नंदीनगरातील जुन्या वादातून रक्तरंजित घटना; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अर्जुन नकलवाडचा दगड-विटांनी मारहाणीत मृत्यू

मुदखेड (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील नंदीनगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत उफाळलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा दगड-विटांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. अर्जुन ऊर्फ अजय शिवाजी नकलवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुदखेड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत १२ आरोपींना अटक केली. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास नंदीनगर, मुदखेड येथे भिमराव नकलवाड आणि शेषेराव ऊर्फ केशव नकलवाड या दोन गटांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आला. सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी अर्जुन ऊर्फ अजय शिवाजी नकलवाड (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. नंदीनगर, मुदखेड) हा तरुण इतर लोकांसह मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. मात्र, याच वेळी वादाला हिंसक वळण लागले. आरोपींनी अर्जुनच्या डोक्यावर आणि छातीवर दगड व विटांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे नंदीनगर परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाची आई सौ. लक्ष्मीबाई शिवाजी नकलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १८९(२), १९० आणि १९१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची तातडीची कारवाई; १२ जणांना अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी मुदखेडचे प्रभारी अधिकारी गणेश कराड यांना आरोपींना तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक भोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड ग्रामीण यांनीही घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी काही तासांतच १२ आरोपींना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मुदखेड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1\. भिमराव चिन्ना नकलवाड (वय ६५, रा. नंदीनगर, मुदखेड)

2\. सुभाष भिमराव नकलवाड (वय २८, रा. नंदीनगर, मुदखेड)

3\. रमेश भिमराव नकलवाड (वय २७, रा. वसमत; हल्ली मुक्काम नंदीनगर, मुदखेड)

4\. राहुल भिमराव नकलवाड (वय २२, रा. चुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी; हल्ली मुक्काम नंदीनगर, मुदखेड)

5\. बाबुशा भिमराव नकलवाड (वय ३५, रा. वसमत, जि. हिंगोली; हल्ली मुक्काम नंदीनगर, मुदखेड)

6\. शेषेराव ऊर्फ केशव गोविंद नकलवाड (वय ६०, रा. नंदीनगर, मुदखेड)

7\. संभाजी शेषराव ऊर्फ केशव नकलवाड (वय २७, रा. नंदीनगर, मुदखेड)

8\. मारोती शेषराव ऊर्फ केशव नकलवाड (वय २५, रा. नंदीनगर, मुदखेड)

9\. अजय शेषराव ऊर्फ केशव नकलवाड (वय २०, रा. नंदीनगर, मुदखेड)

10\. अर्जुन ऊर्फ राजेश शेषराव ऊर्फ केशव नकलवाड (वय २०, रा. नंदीनगर, मुदखेड)

11\. रवि ऊर्फ मुन्ना नकलवाड (वय २१, रा. नंदीनगर, मुदखेड)

12\. सुनील भिमराव नकलवाड (वय २५, रा. नंदीनगर, मुदखेड)

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्ना राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे तसेच पोलीस अंमलदार ठाकूर, पाटील, पैसनवाड, चव्हाण, झुंझारे, वानोळे, कारामुंगे आणि पुणेबोईनवाड यांनी सहभाग घेतला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search