सिलिंडर तुटवड्याविरोधात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन:वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा
![]()
अमरावती येथे सिलींडरच्या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. आंदोलकांनी चक्क चूल पेटवून भाकरी शिजवल्या आणि सिलींडरचा पुरवठा नियोजित वेळेत करण्याची मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार आणि जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी केले. देशभरात, विशेषतः अमरावतीमध्ये सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेनेही पाठिंबा दिला. दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आंदोलकांनी तिथेच चूल पेटवून भाकरी शिजवून आपला निषेध नोंदवला. या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे संजय चोरपगार, आर. के. भटकर, मदन खंडारे, नयन मोंढे, बाबाराव गायकवाड, रमेश आठवले, शैलेश बागडे, सुरेश तायडे, अमोल जंजाळ, प्रशांत गजभिये, करण जाधव, अलंकार बागडे, आनंदराव इंगळे, विद्या तायडे, जया होमनेर, सोनू तायडे, सुधीर कांबळे, रीना गजभिये, अस्मिता बागडे, पुष्पा बोरकर, सुनिता रामटेके, मालती मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान ‘नरेंदर..कब मिलेगा सिलेंडर’, ‘केंद्र सरकारचा निषेध असो’, ‘बाळासाहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’, ‘भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सिलींडरचा पुरवठा त्वरित आणि नियमित करण्याची मागणी केली.
