आरती अंकलीकर-टिकेकर यांना कलाश्री पुरस्कार:२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा पिंपळेगुरव येथे समारोप

0
c4230449-9e60-4d0e-ae35-f5317db4fde6_1775467885646.jpg




पिंपळेगुरव येथे झालेल्या २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा नुकताच समारोप झाला. या महोत्सवात ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ ‘कलाश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना अंकलीकर-टिकेकर यांनी सांगितले की, एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार असतो. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाने आयोजित केलेला हा तीन दिवसीय महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात पार पडला. ‘कलाश्री पुरस्कारा’चे हे २८ वे वर्ष असून, यात रोख १ लाख ५१ हजार १०१ रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र यांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘कलाश्री युवा पुरस्कार’ युवा तबला वादक सोहम गोराणे यांना प्रदान करण्यात आला. पं. योगेश समसी यांचे शिष्य असलेल्या सोहम गोराणे यांना ११ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, नगरसेवक प्रशांत शितोळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, कीर्तनकार चेतनानंद गावडे महाराज, तबलावादक पं. रामदास पळसुले, ओअॅसिस एन्टरप्रायझेसचे महेश जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. अंकलीकर-टिकेकर पुढे म्हणाल्या की, जेव्हा तानपुरा सुरात मिळवता येतो आणि तो सुंदर छेडता येतो, तेव्हा तो जपमाळेसारखा बनतो. त्यानंतर मन एकाग्र करून तानपुऱ्याच्या झंकारात आपला स्वर असा मिसळायचा की तो वेगळा वाटू नये, इथेच संगीताच्या साधनेला सुरुवात होते. त्यांनी आपले सर्व पुरस्कार गुरु आणि आई-वडिलांना समर्पित करत, शास्त्रीय संगीताची साधना खडतर आणि कष्टाची असल्याचेही नमूद केले. यामध्ये सुरुवातीची अनेक वर्षे विद्यार्थी हा फक्त रियाजच करीत असतो. कोणत्याही प्रकारचे यश, प्रसिद्धी ही त्याला सुरुवातीच्या या काळात मिळत नाही. केवळ रियाज करत राहणे आणि गात राहणे हेच संगीत साधकाचे काम असते. त्यामुळे ज्यांना गायला आवडते, वाजवायला आवडते त्यांनीच या क्षेत्रात यावे असा सल्लाही आरती अंकलीकर टिकेकर यांनी दिला. माझ्या यशाचे श्रेय हे श्रोत्यांचे देखील आहे असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed