अनुवाद म्हणजे दोन संस्कृतींमधील संवाद सेतू:मनुष्याला विविध संस्कृतींची ओढ पूर्वीपासूनच, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांचे प्रतिपादन

0
6fac62e4-5704-419f-988e-97235db0c47c_1775467585926.jpg




ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी अनुवाद म्हणजे दोन संस्कृतींमधील संवाद सेतू असल्याचे मत व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित अनुवादित शब्दोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला. अक्षरधारा बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज वाचक कट्टा येथे हा शब्दोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुश्रुत कुलकर्णी, मीना शेटे संभू, शुचिता फडके, आशा गुर्जर आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ‘अनुवाद’ या विषयावर चर्चासत्र झाले, ज्यात सुश्रुत कुलकर्णी, मीना शेटे संभू, शुचिता फडके आणि आशा गुर्जर यांनी सहभाग घेतला. तसेच, ऋग्वेद अभय इनामदार यांनी ‘पॅपिलॉन’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले. रवींद्र गुर्जर यांनी पुढे सांगितले की, मनुष्याला विविध संस्कृतींची ओढ पूर्वीपासूनच आहे. या उत्सुकतेपोटीच विविध संस्कृती, रूढी, परंपरा आणि चालीरिती जाणून घेण्यासाठी अनुवाद हा साहित्य प्रकार अस्तित्वात आला. अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत साहित्य नेणे इतका मर्यादित अर्थ नसून, त्याला अनेक पैलू आहेत. यावेळी बोलताना आशा गुर्जर म्हणाल्या की, संस्कृत भाषा क्लिष्ट असली तरी ती तितकीच अर्थपूर्ण आहे. संस्कृतमध्ये कालातीत साहित्य निर्मिती झाली असून, ते साहित्य मराठीत आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हे काम त्या टप्प्याटप्प्याने करत आहेत. मीना शेटे संभू यांनी अनुवादाचे क्षेत्र पूर्वीपेक्षा अधिक विस्तारले असून, तंत्रज्ञानामुळे अनुवादित साहित्य निर्मितीला गती मिळाल्याचे नमूद केले. तर, शुचिता फडके यांनी अनुवाद शिकून येत नसून, ती एक आंतरिक प्रेरणा असावी लागते असे सांगितले. अनेक अनुवादकांसोबत काम केल्यामुळे अनुवाद करताना काय टाळावे, हे त्यांना लक्षात आले. सुश्रुत कुलकर्णी यांनी भाषा आणि संस्कृती जोडण्यासाठी अनुवादक पुलाचे काम करतो असे म्हटले. इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव पाहता, मराठी भाषा आणि साहित्य टिकेल की नाही, अशी शंका उपस्थित होते. मात्र, अनुवादामुळे ज्ञानाचे लोकशाहीकरण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed