“श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी मुळशीत 25,000 एकरावर लवासा आणि लोणावळ्यात 10,600 एकरावर अॅम्बी व्हॅली सिटी उभी राहिली, तेव्हा तथाकथित पर्यावरणप्रेमींना निसर्गाचा ऱ्हास दिसला नाही. आता मात्र भीमाशंकर परिसरामध्ये 600 एकरावर शेतकऱ्यांना आणि उद्योगांना लागणारी स्वस्त वीज देण्यासाठी जलविद्युत प्रकल्प उभा राहत असताना, हेच उपटसुंभ विरोध करायला पुढे आले आहेत. प्रकल्प परराज्यात गेला तरी ओरडायचे आणि राज्यात आला तरी आक्रमक व्हायचे, या विरोधकांना नेमके काय करायचे आहे यासाठी त्यांचे आधी प्रशिक्षण शिबिर घ्यायला हवे,” असा घणाघाती हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी भीमाशंकर-कर्जत जलविद्युत प्रकल्पातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून रान उठवणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारी वीज, धरणांचा इतिहास, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांचे विधान आणि मतदार याद्यांच्या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेवर आपली सविस्तर भूमिका मांडली. लवासा अन् अॅम्बी व्हॅलीने राज्याला काय दिले? पर्यावरणवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना सदाभाऊ खोत म्हणाले, “सह्याद्रीच्या कुशीत मुळशी भागात 25,000 एकरावर लवासा प्रकल्प उभारला गेला, तर लोणावळा परिसरात 10,600 एकरावर अॅम्बी व्हॅली सिटी झाली. या प्रकल्पांत नेमके कोण राहायला गेले आणि त्यातून महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी किंवा लहान उद्योजकाला काय फायदा मिळाला, याचा ताळेबंद कोणी मांडत नाही. तेव्हा पर्यावरणाला धोका पोहोचला नाही का?” भीमाशंकर प्रकल्पाची गरज “भीमाशंकर परिसरात केवळ 600 एकरावर हा जलविद्युत प्रकल्प होत आहे. या प्रकल्पामुळे जी वृक्षतोड होणार आहे, त्या बदल्यात नव्याने वृक्षलागवड करण्याचे धोरण सरकारने आधीच निश्चित केले आहे. पाण्यावर निर्माण होणारी ही वीज स्वस्त दरात उपलब्ध होणार असून, यामुळे शेती आणि उद्योगांमध्ये मोठी क्रांती होईल. लाखो तरुणांना रोजगार मिळेल. मग या राज्याला अंधारात ढकलण्याचे कारस्थान हे उपटसुंभ का करत आहेत?” कधी शेतात झाड न लावणारे झाले ‘वृक्ष मित्र’ आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांवर आणि संघटनांवर टीका करताना त्यांनी सुनावले. “शेतकरी आपल्या शेतात ऊस, ज्वारी लावतो, बांधावर झाडे लावतो; शेतकऱ्याने केलेली प्रत्येक पेरणी ही वृक्षलागवडच आहे. ज्यांनी कधी स्वतःच्या शेतात ताटवे फुलवले नाहीत, ते आज ‘वृक्ष मित्र’ झाले आहेत आणि ज्यांनी घरात कधी प्राणी पाळले नाहीत, ते ‘प्राणी मित्र’ बनले आहेत. ज्यांना झाडे लावण्याची हौस आहे, त्यांना आम्ही शेताच्या बांधावर आणि गायरान जमिनींवर हजारो एकर जागा देतो, तिथे त्यांनी झाडे लावावीत. गावातील मोकाट कुत्रे सांभाळून त्यांना भाकरी घालावीत.” धरणांच्या इतिहासाची आठवण “राज्यात कोयना धरण असो किंवा चांदोलीचे वसंतसागर धरण, ती उभारताना झाडे तोडली गेली होती. मात्र त्याच धरणांच्या पाण्यामुळे आज लाखो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोट्यवधी झाडे जगवली आहेत, याचा विसर विरोधकांना पडला आहे का? मेट्रो, समृद्धी महामार्ग, मोठे हायवे प्रत्येक चांगल्या प्रकल्पाला विरोध करण्याची खोड लागली आहे.” प्रशिक्षणाची गरज “आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे तिथे जात आहेत, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत आहेत. प्रकल्प राज्याबाहेर गेला तरी हे आक्रमक होतात आणि प्रकल्प राज्यात आला तरी आक्रमक होतात. त्यामुळे विरोधकांनी नेमके कशावर आक्रमक व्हावे, यासाठी त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेणे गरजेचे आहे.” नाचता येईना अंगण वाकडे; काँग्रेसची अवस्था भान हरपल्यासारखी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर आणि मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर खोत यांनी कडाडून टीका केली. “पाटण्यातील सभेत एका तरुणाने विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधानांच्या वडिलांवरून अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. काँग्रेसची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. भान हरपल्यासारखे त्यांचे नेते बरळत आहेत.” एसआयआरमुळे दुबार मतदारांना चाप “मतदार याद्यांचे शुद्धीकरण (SIR) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. एकाच व्यक्तीचे नाव मुंबईतही असायचे आणि गावाकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेलाही असायचे. आता या तंत्रज्ञानामुळे एकाच ठिकाणी नाव राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मतचोरी थांबत असल्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडी पोटदुखीने समाजात संभ्रम पसरवत आहे,” असेही खोत यांनी स्पष्ट केले. ———————————————————————————————– हेही वाचा… मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?: कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation 'ट्रॅफिक बघितलं की देशाचं भविष्य दिसतं':पुन्हा कामे काढता यावीत म्हणून रस्ते बांधले जातात; वाहतुकीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची टीका सक्तीची कर्जवसुली करून शेतकऱ्याला छळाल तर तुरुंगात खडी फोडायला पाठवू:नाशिकमधून एकनाथ शिंदेंचा इशारा, 10 हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप