मुदखेड (प्रतिनिधी) – घरखर्च आणि आईच्या आजारपणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याच्या कारणावरून एका मजुराचे त्याच्या घरातून बळजबरीने अपहरण करून, त्याला ४०,००० रुपयांच्या मागणीसाठी लाकडी काठीने मारहाण करत एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड येथील खालसा फायनान्सच्या मालकासह इतर तिघांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून जारी केलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली. नेमकी घटना काय? माळकौठा, ता. मुदखेड येथील फिर्यादी दत्ता किशन गायकवाड, वय ३७ वर्षे यांनी घरखर्च व आईच्या आजारपणासाठी नांदेड येथील हिंगोली गेट, फुले मार्केट परिसरातील खालसा फायनान्सकडून ८,००० रुपयांचे कर्ज घेतले होते. दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास खालसा फायनान्सचे मालक व त्यांच्यासोबत आलेल्या इतर तिघांनी माळकौठा येथे फिर्यादीच्या घरी जाऊन कर्जाचे हप्ते का भरत नाहीस असा जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून नांदेड येथील हिंगोली गेट भागातील खालसा फायनान्सच्या कार्यालयात नेले. मारहाण, डांबून ठेवणे व जिवे मारण्याची धमकी कार्यालयात नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे तात्काळ ४०,००० रुपयांची मागणी करत शिवीगाळ केली. तसेच थापडा-बुक्क्यांनी व लाकडी काठीने पायावर मारून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीला धनेगाव परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल फिर्यादी दत्ता गायकवाड यांनी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता BNS च्या खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे: कलम: १४०/२, ११८/१, ११५/२, ३५२, ३५१/३ व ३/५ या गुन्ह्याचा पुढील तपास मुदखेड पोलीस करत आहेत. पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन कर्जवसुली किंवा फायनान्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा त्रास, धमकी अथवा दबाव येत असल्यास शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी घाबरून किंवा भावनेच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. तक्रार प्राप्त होताच कायद्यानुसार योग्य ती तातडीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे. Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी – VastavNEWSLive.com मुदखेडमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल