देशातील वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि अक्राळविक्राळ होत असून, येथील बेशिस्त ट्रॅफिक बघितले की देशाचे भविष्य कसे असेल हे स्पष्ट दिसते, अशी घणाघाती टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. रस्त्यांवर लेनची शिस्त नसणे, सिग्नल न पाळण्याची प्रवृत्ती आणि केवळ दोन वर्षांत पुन्हा कामे काढता यावीत म्हणून बांधले जाणारे निकृष्ट रस्ते यावरून त्यांनी प्रशासनासह वाहनचालकांच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. ते मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, आज हा वाहतुकीचा प्रश्न आपल्या देशात इतका गंभीर झालेला आहे. जो मी अनेकदा बोलून दाखवलेला आहे. आता हा प्रश्न पुढे अक्राळविक्राळ होणार आहे. याला कुठल्याही गोष्टीची बंधनं नाहीत. कुठलीही चौकट आपल्याकडे घातली गेली नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक ब्रिटिश का फ्रेंच लेखक होते, त्यांनी फार सुंदर सांगितले होते की तुमच्याकडची लहान मुलं कुठली गाणी गातात, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आता आपल्याकडची मुलं जर ‘बिडी जलाईले’ गाणं गाणार असतील तर देशाचं भविष्य काय असेल. पण तसं मला तेवढंच म्हणायचं आहे की मला या देशातलं ट्रॅफिक बघितलं की या देशाचं भविष्य दिसतं. आपल्याला माहितीच नाही की गाड्या चालवायच्या कशा पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपल्याला माहितीच नाही की गाड्या चालवायच्या कशा, गाड्या पार्क कुठे करायच्या, हे आम्हालाही माहीत नाही आणि सरकारलाही माहीत नाही. त्यामुळं त्याला आकार उकार नावाची गोष्टंच नाही राहिली. आपल्याकडे फक्त पूल बांधले जातात, फ्लाय ओव्हर्स किंवा ब्रिजेस. आणि रस्ते अशासाठी बांधले जातात की परत दोन वर्षात कामं निघावीत. त्यामुळे या देशात ट्रॅफिकचा गांभीर्याने विचार होताना कुठेही दिसत नाही. मी आत्ता त्यांना तेच सांगत होती की ई-चालान कशासाठी फाडली जातात. मी म्हटलं अनेकवेळा आम्ही बघतो हायवेनी जात असताना कुठेही जात असताना अनेकदा लॉऱ्या, टेम्पो, ट्रेलर्स सगळ्या उजव्या बाजूने चालली असतात रस्त्याच्या. खरं तर त्यांनी पूर्णपणे डाव्या बाजूने चाललं पाहिजे. हा कायदा आहे, हा नियम आहे, कोण पाळतंय? कोणी नाही पाळत. रस्त्याच्या कॉर्नरला गाड्या पार्क करू नयेत, हा कायदा आहे, कोण पाळतं? कोणीही पाळत नाही. दुचाकी चालवणाऱ्यांना तर असं वाटत असतं की हा सिग्नल आल्यासाठी नसतोच राज ठाकरे म्हणाले, माणसाचं काम कमी व्हावं म्हणून यंत्र आली. आणि आपल्याकडे काय ट्रॅफिक सिग्नल आहेत, ज्यांच्यामुळे कॉंस्टेबलचं काम कमी व्हावं. आमच्याकडे ट्रॅफिक सिग्नल पण असतो आणि पुढे हवालदार पण असतो. काय खात्री आहे बघा आपल्या देशात, की हा सिग्नल पाळणार नाही. माणसाचं काम कमी करण्यासाठी यंत्र आली असतील तर उपयोग काय? आपल्याकडे दुचाकी असतात, चारचाकी असतात, मला आठवतंय की मुंबईत मागे रात्री साधारण एक वाजला असेल आणि सिग्नल चालू असेल तर गाड्या थांबल्या जायच्या. आज दुपारी एक वाजता सुद्धा थांबत नाहीत. आपल्यातील अनेक जण असतील जे दुचाकी चालवतात. दुचाकी चालवणाऱ्यांना तर असं वाटत असतं की हा सिग्नल आल्यासाठी नसतोच. मी मध्यंतरी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, आयुक्तांना सांगितलं, पुढे काही नाही, ढीमम. नो पार्किंगसंदर्भात राज ठाकरेंची संकल्पना पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी त्यांना सांगितलं होतं की जे फूटपाथ आहेत, जे कॉर्नर आहेत, जिथे नो पार्किंगचा बोर्ड आहे, एका बोर्डाने काय होणार आहे? कोणाला दिसणार आहे? मी त्यांना सांगितलं की नो पार्किंगचा फुटपाथ हा तुम्ही काळ्या आणि लाल पट्ट्या असतात त्याच्यामध्ये करा म्हणजे लोकांना समजेल की इथे पार्किंग करायचं नाही. आणि जिथे पार्किंग करायचं आहे तिथे पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यात म्हणजे समजा फुटपाथ जर रंगवला तर लोकांना सोपं जातं बघायला. मी दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा सांगितल्यानंतर दादरमध्ये कुठे तरी रंग लावले. लोकांना कसं समजणार? वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या पाहिजेत की ह्या ह्या तारखेपासून ही ही योजना आखली जाईल. नागरिक म्हणून आपण जर जबाबदारी स्वीकारावी एखाद्या शहराच्या क्षेत्रफळाच्या 15 टक्के हे त्या शहरात रस्ते असले पाहिजेत, हा सर्वसाधारण एक कायदा आहे. पुण्यात किती आहेत माहीत आहे तुम्हाला? 7 टक्के रस्ते आहेत. जिथे 50 माणसं राहत होती, तिथे 500 माणसं राहायला आली, त्यांच्या गाड्या आल्या, त्या कुठे पार्क करणार आहेत? आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग होत नाही. याच्यातून हा सगळा बोजवारा उडतो. याचं पुढे काय होणार आहे, माहीत नाही. पण नागरिक म्हणून आपण जर जबाबदारी स्वीकारली आणि आपण जर त्या गोष्टींचे नियम पाळले तर आपोआप या गोष्टींची सुरुवात होईल. आता मला पोलिस संरक्षण आहे, माझ्या मागे पोलिसांच्या गाड्या असतात. पुढे पायलट गाडी असते. मी त्यांना दरवेळा सांगत असतो की तो आवाज बंद करा, टॅव-टॅव-टॅव-टॅव आवाज सुरूच असतो त्याचा. मला असं वाटतं पकडून नेतायत. संरक्षणासाठी आहेत की पकडून नेतायत मला, असे राज ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माझ्या सर्व चालकांना माझी सक्त ताकीद असते, सिग्नल मोडायचा नाही राज ठाकरे म्हणाले, सांगायची गोष्ट अशी की मी माझ्या सर्व चालकांना माझी सक्त ताकीद असते, सिग्नल मोडायचा नाही. कितीही कितीही अर्जंट असेल काम तरी सिग्नल मोडायचा नाही. याचं कारण माझे जे सहकारी आहेत, मला जे बघतील, त्यांना वाटेल अरे साहेबांनी सिग्नल तोडला. ते खरा तोडू शकतात हं! (हशा) पण मला असं म्हणायचं आहे की आपण जर काही गोष्टी स्वतःहून ठरवल्या तर हे प्रश्न आपोआप सुटतील. मी पुन्हा या गोष्टी सरकारला सांगणार आहे. हे पुण्या-मुंबई आणि सगळ्या शहरांची परिस्थिती मला अशी दिसत आहे की सकाळी सगळे जणं उठतील गाड्यांमध्ये बसतील आणि तिकडंच असतील. गाडी पुढे तर जायला पाहिजे न. रोज गाड्यांचं रजिस्ट्रेशन किती होत आहे. किती गाड्या येत आहेत, किती दुचाकी, किती चारचाकी येतायत, काही माहितीच नाही. इमारती वाढत आहेत. आणि नंतर सगळ्याची जबाबदारी कोणावर टाकायची तर पोलिसांवर. शिव्या खायला कोण तर पोलिस. का? आपण शिस्त पाळत नाही आणि सगळा बोजा टाकायचा पोलिसांवर? आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 7.8 टक्के आपला जीडीपी झाला, चाटायचा का तो? पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, संध्याकाळी फिरायला जाताना, कामावर जाताना आपण गाडी कुठे पार्क करतोय नेमकं, याचा लोकांना त्रास होणार आहे का? काही कसलाही विचार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आणायच्या, त्या खराब करायच्या. आज तरी मुंबई सारख्या ठिकाणी लाखो प्रवासी रेल्वेमधून प्रवास करतात. उद्या जर समजा ती रेल्वे कोलमडली आणि सगळे गाड्यांमध्ये आले तर कुठून बाहेर पडाल रे घरातनं? काही आकारच राहिलेला नाही शहरांना आपल्याकडे. फुटपाथवर चालता येत नाही, आपल्याकडे बागा नाहीत, मैदानं नाहीत. आणि सांगायचं काय? 7.8 टक्के आपला जीडीपी झाला आहे, काय चाटायचा का तो? जमिनीच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, तलाव बुजवून टाकले जात आहेत, तिकडे कॉलनी उभ्या केल्या जात आहेत. तिथे टॅंकरने पाणी जात आहे. याला काही शिस्त म्हणतात का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले, मी अनेकवेळा सांगितलं आहे की मी स्वित्झर्लंड देशात गेलो होतो. उत्तम शिस्त आहे. मला तिथे पहिला प्रश्न हा पडला की इथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? सगळं तर चांगलं आहे. तिथेही प्रश्न आहेत, ते आपल्याला नाही कळणार. तसंच ज्यावेळेला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एखादा माणूस येतो आणि तिकडे मंत्री पदावर बसतो, त्याला मुंबईमधले, नवी मुंबईतले, पुण्यातले प्रश्न नाही समजू शकत. आज आपण जर ग्रामीण भागात गेलो तर तिथले प्रश्न आपल्याला नाही पटकन समजणार. पण एखादा मंत्री येतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे? रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे. तो विचार करतो त्याच्या नजरेतून. त्यामुळे त्याला असं वाटतं की सगळंच आहे. हा प्रश्न दृष्टिकोनातला आहे. यासाठी तज्ञ मंडळी असतात, त्यांच्यासोबत बसून आराखडा तयार करायचा असतो. महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देतो याची वाट पाहतोय खरंच मी वाट बघतोय की हा महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देतो त्याची. अशा प्रकारच्या गोष्टींना शिस्त लावण हे काही रॉकेट सायन्स नाही, याला फक्त इच्छा लागते. वाहतूकदारांचा जो प्रश्न आहे तो कसा पुढे न्यायचा ते बघू. पण तुमचे जे काही चालक आहेत, त्यांनाही शिस्त लावणं गरजेचं आहे. हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर स्वतःपासून सुरुवात केलेली केव्हाही चांगली, असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search