अंबाडा, घाटलाडकी भागातही गॅस टंचाईचा फटका, नागरिकांचे हाल:गेल्या महिनाभरापासून सिलींडर मिळत नसल्याने त्रास
![]()
प्रतिनिधी | घाटलाडकी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जाणवत असलेले सिलींडरच्या तुटवड्याचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. मोर्शी तालुक्यातील अंबाडा, घाटलाडकी भागातील नागरिकही या समस्येचा सामना करित असून गेल्या महिनाभरापासून सिलींडर मिळत नसल्याची या भागातील नागरिकांची ओरड आहे. गॅस सिलींडरच्या तीव्र तुटवड्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घाटलाडकी परिसरात भारत गॅस एजन्सीकडून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलींडरचे वितरण करण्यात आले होते. परंतु मागील महिन्यापासून गॅसच्या गाड्या ग्रामीण भागात येत नसल्याने नागरिकांना तब्बल ६० किलोमीटर अंतर पार करून पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच एचपी गॅस ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सिलींडर मिळवावे लागत आहे. दरम्यानी दिवसभर मजुरी सोडून गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसानही होत आहे. सिलींडर वेळवेर मिळत नसल्याने मानसिक त्रास तर सर्वांचाच वाढला आहे, सोबत आता वेळही भरपूर द्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण महिलांना याचा मोठा फटका बसत आहे.श हरी महिलांच्या तुलनेत गावातील महिलांसोबत दुजाभाव होत असल्याचा स्त्री शक्तीचा आरोप आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालमर्यादा अन्यायकारक सध्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन सिलींडरमधील अंतर खूप वाढवले आहे. शहरी भागासाठी २५ दिवस आणि ग्रामीण भागासाठी ४५ दिवस केले आहे. मुळात खेड्यातील घरांमध्ये राहणाऱ्यांची संख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नियमित गॅस पुरवठा व्हावा. महिलांचे आरोग्य सुधारावे, त्या धुरमुक्त वातावरणात जगाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेद्वारे गॅस कनेक्शन देण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याच महिलांवर पुन्हा चुलीचा वापर करण्याची वेळ ओढवली आहे. गॅस सिलींडर मिळत नसल्याने महिलांनी पुन्हा आपला मोर्चा सरपण गोळा करण्याकडे वळविला असून चुली पेटविल्या आहेत.
