करुणा मुंडेंही बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात:अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल, म्हणाल्या – प्रजातंत्र वाचवण्यासाठी लढणार
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र त्यांच्या विरोधात आता करुणा मुंडे यांनी शड्डू ठोकला आहे. करुणा मुंडे यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने बारामतीचा राजकीय पारा अचानक वाढला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी आजपर्यंत ६८ उमेदवारी अर्ज आले आहेत. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काँग्रेसने याठिकाणी आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही आज आपला अर्ज दाखल केला आहे. तसेच याआधी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीचा निकाल २३ एप्रिल रोजी लागणार आहे. करुणा मुंडे काय म्हणाल्या? उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “गेल्या 10 दिवसांपासून मी बिनविरोध निवडणुकीच्या गप्पा ऐकत आहे. पण लोकशाहीत मतदारांना निवडीसाठी चॉईस (पर्याय) असायला हवा. कोणत्याही मोठ्या पक्षाने किंवा तगड्या उमेदवाराने अजून धाडस दाखवले नाही, म्हणून मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आले आहे. निवडणूक झालीच पाहिजे, तरच प्रजातंत्र वाचेल” विशेष म्हणजे, “मी बारामती पाहिलेली नाही, त्यामुळे तिथे नक्की काय विकास झाला आहे याची मला कल्पना नाही. मात्र, अनेक बारामतीकर माझ्याकडे मदतीसाठी आले, त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मी केवळ बारामतीचे मुद्दे घेऊन लढत नाहीये, तर संपूर्ण राज्यातील अन्यायाविरुद्ध हा माझा लढा आहे. बारामतीमधील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. जर मतदारांनी मला संधी दिली, तर त्या संधीचे सोनं करून मी गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करेन,” असे साद त्यांनी बारामतीकरांना घातली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात चांगल्याच भावुक झाल्या. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अजितदादांचे हे विचार होते. त्यांच्यानंतर मी माझे दुःख तळघरात कोंडून तुमच्या सेवेसाठी पुढे आले आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या.
