चाचडगावला ५१ लाख रुपयांचा गुटखा जप्त:दिंडाेरी पाेलिसांची कारवाई; चालक अटकेत
![]()
प्रतिनिधी | दिंडोरी नाशिक–पेठ रस्त्यावरील चाचडगाव शिवारात दिंडोरी पोलिसांनी रविवारी (दि. ५) पहाटे धाडसी कारवाई करत गुजरातमधून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या आणला जात असलेला ५१ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू, अंदाजे २० लाख रुपये किमतीचा कंटेनर तसेच ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ७१ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून वाहनमालक फरार आहे. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे मविप्र महाविद्यालयासमोर सापळा रचण्यात आला होता. संशयास्पद वाटणारा कंटेनर (एमएच ०५ एएम १८२१) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी मारुती रभाजी वाळुंज (५३, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या चालकास अटक करण्यात आली आहे. वाहनमालक गणेश सुमंता वाघोले (रा. जुन्नर, जि. पुणे) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर गुटखा गुजरात राज्यातून कर चुकवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठाभाऊ बच्छाव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
