[ads1]
![]()
समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, भामट्यांनी चक्क कांद्याने भरलेला एक ट्रक लुटला आहे. ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावलेल्या एका आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी हा ट्रक पळवून नेला. मात्र, बुलढाणा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या काही तासांतच या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिकहून कांदा घेऊन झारखंडकडे जाणाऱ्या या ट्रकच्या चालकाला डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडवण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या या चार आरोपींनी चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला महामार्गावरच सोडून ट्रकसह पोबारा केला. त्यानंतर जखमी चालकाने तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला उपचारासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांची कारवाई चालकाच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी तातडीने समृद्धी महामार्ग पोलिसांच्या कंट्रोल रूमला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत वाशिम जिल्ह्यात सदर कांद्याचा ट्रक आणि स्कोडा कारसह चारही भामट्यांना बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या चार आरोपींपैकी तीन जण नाशिक जिल्ह्यातील असून एक जण बांगलादेशी आहे. अटकेनंतर या सर्वांना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांनी आपल्या आलिशान कारवर ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावला होता, ज्यामुळे त्यांना तपासणीसाठी कुठेही रोखण्यात आले नाही. महामार्गावर अलीकडच्या काळात वाहने अडवून लूटमार करण्याच्या घटना वाढल्याने सध्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीमागील कारण: कांद्याचे वाढलेले दर भामट्यांनी इतर मौल्यवान वस्तू सोडून चक्क कांद्याचा ट्रक का चोरला, यामागे बाजारातील कांद्याचे वाढलेले दर हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. सध्या बाजारपेठेत कांद्याला पाच ते सहा हजार रुपयांचा चांगला भाव मिळत आहे. कांद्याच्या याच वाढलेल्या किमतींमुळे पैशांच्या लालसेपोटी भामट्यांनी कांद्याचा ट्रक लुटल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
[ads2]
समृद्धी महामार्गावर 'महाराष्ट्र शासन'चा बोर्ड लावून लूटमार:भामट्यांनी पळवला चक्क कांद्याचा ट्रक! चारही भामटे गजाआड
















Leave a Reply