आई-वडिलांना 'सरप्राईज' देण्याआधीच काळाचा घाला!:समृद्धी महामार्गावर जालन्याच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाचा भीषण अंत, 7 वर्षांच्या चिमुकल्याचाही मृत्यू

[ads1]


लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने आई-वडिलांना न सांगता अचानक भेटून ‘सरप्राईज’ देण्यासाठी पुण्यावरून गावी जालन्याकडे निघालेल्या एका सुखी कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने भीषण घाला घातला आहे. नागपूर कॉरिडॉरवरील वेरूळ परिसरात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कारने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अत्यंत भीषण अपघातात पती, पत्नी आणि अवघ्या 7 वर्षांच्या गोंडस चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवार, 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे प्रतीक रामकिसन जगदाळे (वय 35, आयटी अभियंता), त्यांची पत्नी श्रेया प्रतीक जगदाळे (वय 32) आणि त्यांचा मुलगा रुद्रांश प्रतीक जगदाळे (वय 7) अशी आहेत. हे जगदाळे कुटुंब मूळचे जालन्याचे असून रोजगाराच्या निमित्ताने ते सध्या मुळशी, पुणे येथे वास्तव्यास होते. अपघाताचा थरार मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक जगदाळे हे आपल्या कुटुंबासह (MH 12 YS 1028) कारने पुण्याहून जालन्याच्या दिशेने पहाटे 6 वाजता निघाले होते. समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर 449 (नागपूर कॉरिडॉर) जवळ पोहोचले असता चालकाला डुलकी आल्याने कारवरील ताबा सुटला. भरधाव कार समोरील (GJ 21 Y 3362) क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे ट्रकच्या खाली घुसून चक्काचूर झाला आणि कारमधील तिघेही गंभीर जखमी अवस्थेत आत अडकून पडले. बचावकार्य आणि पोलिसांची मदत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिस आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत पथकाने ‘क्यूआरव्ही’च्या उपकरणांच्या मदतीने कारचा पत्रा कापून आत अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढले. मात्र, अपघातात डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागल्याने तिघांचाही प्राण गेला होता आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर आई-वडिलांना आनंद देण्यासाठी निघालेल्या या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने जगदाळे कुटुंबावर आणि त्यांच्या मूळ गावी मोठी शोककळा पसरली आहे. एका क्षणाच्या डुलकीने संपूर्ण हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त केले. या हृदयद्रावक घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचे सत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *