[ads1]
एमबीबीएसच्या शिक्षणासाठी इंगोले दाम्पत्याकडून १० हजारांची मदत; पहिल्या पगाराची समाजसेवेची आठवणही जागवली
बारड (प्रतिनिधी) – घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वाटचाल करणाऱ्या बारडच्या काजल गणेश चव्हाण हिच्या मदतीसाठी आता मालेगावकरही पुढे सरसावले आहेत. काजलच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लागावा, या भावनेतून शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले व प्रा. अनुराधा इंगोले यांनी काजलच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
काजलच्या शिक्षणासाठी बारड परिसरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच मालेगावकरांनी दिलेला हा हात तिच्या स्वप्नाला बळ देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रा. अनुराधा इंगोले यांनी आपल्या नोकरीचा पहिला पगार मराठा सेवा संघाच्या वसतिगृहासाठी वर्गणी म्हणून दिला होता. त्यांच्या या योगदानामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार मिळत आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याची ही परंपरा काजलच्या मदतीतूनही पुढे आली.
काजलच्या गुणवत्तेला परिस्थितीची अडचण अडथळा ठरू नये, यासाठी विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. एका गुणवंत लेकीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी गावाची सीमा ओलांडून मालेगावकरही सहभागी झाले, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
यावेळी शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले, प्रा. अनुराधा इंगोले, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी सरपंच दिलीपराव कोरे, डॉ. किरण देशमुख, लक्ष्मीकांत मुळे, राजाभाऊ राजेवार, गुणवंत वीरकर, नामदेव बिचेवार बालाजी चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post Views: 285
[ads2]
















Leave a Reply