[ads1]
![]()
गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळे आणि डीजे चालक-मालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 14 डीजे चालक-मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनीप्रदूषणाबाबत आधीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. डीजे आणि इतर ध्वनीवर्धकांच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ध्वनी मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित मंडळे आणि डीजे चालक-मालकांविरोधात गुन्हे दाखल केले. कारवाईदरम्यान ध्वनीप्रदूषणासाठी वापरण्यात आलेले मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. सांगवीत सर्वाधिक कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सांगवी पोलीस ठाण्यात सर्वाधिक 9 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथे 5, तर भोसरी एमआयडीसी आणि शिरगाव पोलीस ठाण्यांत प्रत्येकी 2 गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच तळेगाव एमआयडीसी आणि बावधन पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यानंद बापटांच्या भूमिकेचीही चर्चा गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुण्यात यंदा मोठी चर्चा झाली आहे. विद्यानंद बापट यांनीही डीजे, लाऊडस्पीकर आणि मोठ्या आवाजातील मिरवणुकांबाबत प्रशासनाने केवळ आदेश काढून थांबू नये, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. न्यायालयाकडून यापूर्वीही ध्वनीप्रदूषणाबाबत विविध निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, हे निर्देश प्रत्यक्ष उत्सवाच्या काळात कितपत पाळले जातात, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे बापट यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी ढोल-ताशे आणि लाऊडस्पीकरचा मोठा आवाज ऐकू येत असल्याने केवळ आदेशांमुळे परिस्थितीत तातडीने बदल झालेला दिसत नाही. त्यांनी लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजावरही नियंत्रण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. नियम बनवण्याबरोबरच त्यांची कठोर अंमलबजावणी झाल्यासच ध्वनीप्रदूषणाला आळा बसेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. न्यायालयीन निर्देशांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई राज्यातील विविध शहरांमध्ये गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यातही प्रशासनाकडून डीजे आणि लेझर लाईटच्या वापराबाबत इशारे देण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. गणेशोत्सव साजरा करताना धार्मिक उत्साहासोबत ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा… तुकाराम मुंढेंच्या मुद्द्याची सुप्रीम कोर्टात दखल:कॅन्सरच्या औषधाच्या किंमतीवर कोर्ट संतापले, ₹2,700चे औषध ₹27,000ला विक्रीचा मुद्दा, ‘रुग्णांकडून अशी वसुली कशी?’ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमतीत मोठी तफावत असल्याचा मुद्दा मंगळवारी सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान समोर आला. एका कॅन्सरवरील आवश्यक औषधाची रिटेलरला मिळणारी किंमत सुमारे ₹2,700 असताना त्याच औषधाची कमाल किरकोळ किंमत म्हणजेच MRP ₹27,000 असल्याची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. या दहा पट किंमत फरकावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सविस्तर वाचा..
[ads2]
विद्यानंद बापटांचा मुद्दा ऐरणीवर; पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेच्या कर्कश आवाजावर पोलिसांचा दणका:20 मंडळांवर गुन्हे, 14 डीजे चालक-मालकांवर कारवाई
















Leave a Reply