[ads1]
![]()
सेलू तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बुधवारी भगवान धुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी सहमती दर्शवली आहे. खासदार अमर काळे यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. रायपूर जंगली येथे 9 सप्टेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पीडित कुटुंबाला योग्य आर्थिक मदत, कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी रोजगार, गावाचे पुनर्वसन, वाघांचा बंदोबस्त यांसह विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या होत्या. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारवर टीका दरम्यान, मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “सरकारची चूक असेल तर कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. भगवान धुर्वे यांच्या मृत्यूनंतर खासदार अमर काळे हे गेल्या 6 दिवसांपासून आंदोलनात सहभागी होते. आता रोहित पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याने प्रशासनावर दबाव वाढला होता. पालकमंत्री, वन विभाग आणि प्रशासनाने पीडित कुटुंबीयांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा मंगळवारी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पीडित कुटुंबीय, ग्रामस्थ, आंदोलनकर्ते आणि प्रशासनाची बैठक झाली. बैठकीत आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही मागण्यांवर कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. शासन निर्णयानुसार वनविभागामार्फत देय असलेली 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई कुटुंबीयांनी स्वीकारावी, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. याशिवाय आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार आदिवासी विकास विभाग आणि वनविभागामार्फत प्रत्येकी 10 लाख रुपये विशेष बाब म्हणून मिळावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आदिवासी विकास विभागाकडून आकस्मिक निधीतून 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. कुटुंबातील एका व्यक्तीला वनमजूर म्हणून रोजगार पीडित कुटुंबाच्या रोजगाराच्या मागणीबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मृत भगवान धुर्वे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस हंगामी वनमजूर म्हणून रोजगार देण्यात येणार आहे. याशिवाय न्यूक्लिअस योजनेतून बचत गटामार्फत 7.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन पुढाकार घेणार आहे. गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव, घरकुलाचा लाभ तसेच मृताच्या 17 वर्षीय मुलाच्या शिक्षणासाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रशासन पाठपुरावा करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना रायपूर परिसरात वाघांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक प्रतिसाद पथकाची व्यवस्था, सर्व्हेलन्स कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, जनजागृती करणे तसेच शेतरस्त्यांच्या दुतर्फा जाळ्या लावणे यांचा समावेश आहे. बुधवारी रायपूरमध्ये अंत्यसंस्कार बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर रायपूर ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांनी आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्कार न झालेल्या भगवान धुर्वे यांच्या पार्थिवावर बुधवारी रायपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मृताचे पुत्र राजेंद्र धुर्वे आणि सचिन धुर्वे यांच्यासह शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, अतुल वादिंले, सौरभ शेळके, पृथ्वीराज शिंदे, निहाल पांडे, ग्रामस्थ आणि समाजातील विविध व्यक्ती उपस्थित होत्या. प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, बोर वन्यजीव क्षेत्राचे उपसंचालक मंगेश ठेंगडी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. हेही वाचा… राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार:एकनाथ शिंदेंनी दिले संकेत; मराठा आरक्षणावर म्हणाले- जरांगेंनी मुंबईत येण्याबाबत पुनर्विचार करावा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील, दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आणि राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सुरू असलेली चर्चा, या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाला भरघोस सवलती दिल्या असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सविस्तर वाचा..
[ads2]
वर्ध्यातील 6 दिवसांचे आंदोलन स्थगित:पीडित कुटुंबाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा, उद्या अंत्यसंस्कार; वाघांच्या बंदोबस्ताचे आश्वासन
















Leave a Reply