पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल:पार्टटाइम जॉब, क्रेडिट कार्ड पडताळणीच्या बहाण्याने 4.11 आणि 3.73 लाखांची फसवणूक

[ads1]


पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. पार्टटाइम नोकरी आणि क्रेडिट कार्ड पडताळणीच्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनांमध्ये एकूण ७.८५ लाखांची फसवणूक झाली आहे. नऱ्हे येथील ४० वर्षीय शशिकांत परमेश्वर चौगुले यांची पार्टटाइम जॉबच्या आमिषाने ४ लाख ११ हजार ९५० रुपयांची फसवणूक झाली. आरोपींनी त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला छोटे टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून त्यांचा विश्वास जिंकला. विश्वास बसल्यावर चौगुले यांच्या खात्यात काही रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवून त्यांना वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी एकूण ४ लाख ११ हजार ९५० रुपये गमावले होते. ही घटना १७ मार्च २०२५ पासून घडली. नऱ्हे पोलिसांनी मोबाइल क्रमांक, टेलिग्राम ग्रुप आणि ॲप चालवणारे तसेच संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या एका घटनेत, ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा पत्ता पडताळणीच्या बहाण्याने ३४ वर्षीय संतोष अनंत शेलार यांची ३ लाख ७३ हजार १२१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. आरोपीने मुंबईतील ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. क्रेडिट कार्डची पत्ता पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे सांगून आरोपीने शेलार यांच्याकडून काही फोटो मागवले. बँकेचा कर्मचारी असल्याचा विश्वास निर्माण करून त्याने शेलार यांच्याकडून माहिती मिळवली आणि त्यांची फसवणूक केली. ही घटना २५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान घडली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी मोबाइल क्रमांकधारक आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, ट्रस्टच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ विश्वस्तांना हटवून नवीन विश्वस्त नेमल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तानंद नामदेव सोनवलकर (६०) आणि वीणा दत्तानंद सोनवलकर (५५) अशी आरोपींची नावे आहेत. पिंपरी येथील ६९ वर्षीय अर्जुन बाबूराव ठाकरे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपींनी ट्रस्टच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मूळ विश्वस्तांच्या महत्त्वाच्या पदांमध्ये बदल केले. यासाठी कोणतीही अधिकृत बैठक बोलावली नाही किंवा मूळ विश्वस्तांना माहिती दिली नाही, असा आरोप आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *