[ads1]
![]()
नागपूरमध्ये एका टॉवरवर चढलेल्या ‘वेडसर’ तरुणाला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाला अडीच तास कसरत करावी लागली. जवान जवळ जाताच तो तरुण आणखी वर चढत होता. अखेर तीन जवानांनी त्याला पकडून सुखरूप खाली आणले. ही घटना मंगळवारी सकाळी अहिंसा चौक, आमदार निवास, लॉ कॉलेज रोड येथील टॉवरवर घडली. सकाळी ११.४५ वाजता अग्निशमन विभागाला याची माहिती मिळाली. सिव्हील अग्निशमन केंद्रातून पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुमारे २० वर्षांचा किशोर ऊर्फ मोनू बरसन सिन्हा टॉवरच्या उंच भागात चढून बसल्याचे दिसले. परिस्थिती गंभीर असल्याने टीटीएलच्या (Turntable Ladder) मदतीने बचावकार्य सुरू झाले. उप अग्निशमन अधिकारी मानके, राजूरकर, चालक नयन पेठे, कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवान दिसताच मोनू आणखी वर सरकत होता. टॉवरवरील वायरिंग आणि इतर अडथळ्यांमुळे टीटीएलची केज थेट त्याच्याजवळ नेणे शक्य नव्हते. त्यामुळे जवानांना केजची दिशा आणि उंची वारंवार बदलावी लागली. जवानांनी त्याच्याशी संवाद साधत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला पाणी आणि नाश्ताही दिला, पण तो खाली येण्यास तयार नव्हता. अखेर अग्निशमन दलाने नवीन रणनीती आखली. यावेळी टीटीएलच्या केजमधून एक अधिकारी आणि एक कर्मचारी टॉवरवर गेले, तर आणखी एक कर्मचारी थेट टॉवरच्या शिडीने वर चढला. योग्य क्षण साधत तिघांनी मोनूला पकडले आणि त्याला केजमध्ये आणले. दुपारी २.१८ वाजता त्याला सुखरूप खाली आणण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. अंबाझरीचे ठाणेदार विनोद गोडबोले यांनी सांगितले की, त्याला नैराश्य नाही किंवा आत्महत्येचा प्रयत्न नव्हता. त्याचे कुटुंबीय रायपूरहून नागपूरकडे निघाले असून ते आल्यानंतर मोनूला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
[ads2]
नागपूरमध्ये टॉवरवर चढला 'वेडसर' तरुण:जवान जवळ जाताच पुन्हा वर चढायचा; अडीच तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली आणले
















Leave a Reply