[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व रेती चोरीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवाया केल्या. वाहेगाव आणि मार्कंड येथील गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी वाहेगाव गोदावरी नदीपात्रात अवैध रेतीउपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता नदीपात्रातून विनापरवाना रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करत ७ तराफे आणि १४ ब्रास रेती असा अंदाजे ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच दिवशी मार्कंड गोदावरी नदीपात्रातही पोलिसांनी कारवाई केली. येथे अवैध रेतीउपसा करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून संबंधित इसम पळून गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून एक इंजिन, आठ तराफे आणि १६ ब्रास रेती असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंजिन जागेवरच नष्ट करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, रेती चोरी आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि इतवारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली.
अवैध रेतीउपशाची माहिती पोलिसांना द्या
गोदावरी नदीपात्रासह इतर ठिकाणी अवैध रेती उत्खनन, वाहतूक किंवा गौण खनिज चोरी होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post Views: 391
[ads2]
















Leave a Reply