[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – बाफना परिसरातील खून प्रकरणात मागील महिनाभरापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी बाफना परिसरातील कार बाजार शॉपसमोर मंगल शंकर गवळे (वय 32, रा. लोंढेसांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) याचा तीन अनोळखी इसमांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला होता. या घटनेप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 270/2026, कलम 103(3), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, राजू रतन जोंधळे हा मागील महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष शोधमोहीम राबविण्यात येत होती.
दरम्यान, इतवारा पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला आरोपी राजू जोंधळे याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माळ टेकडी ब्रिजखालील चहाच्या दुकानासमोर सापळा रचला. आरोपी तेथे येताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या आदेशाने, पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे,इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड तसेच पोलीस अंमलदार मिर्झा अख्तर बेग, बंडू कलंदर, सदाशिव कदम, शेख गीट्टे, साहेबराव जगताप, शेख इस्राईल व रेवणनाथ कोरनुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.फरार आरोपीला जेरबंद केल्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
[ads2]
















Leave a Reply