शासकीय धान्य खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता निकष लागू – VastavNEWSLive.com

[ads1]

नांदेड (जिमाका) –  केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खरीप पणन हंगाम 2026-27 साठी धान, तांदूळ, ज्वारी, मका व अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता विनिर्देश निश्चित केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करणारेच धान्य स्वीकारले जाणार आहे. शेतकऱ्यांनी धान्य स्वच्छ, पूर्णपणे वाळवून आणि दर्जेदार स्वरूपात खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

धानासाठी चांगला व्यापारी दर्जा, स्वच्छता, कोरडेपणा तसेच दाण्यांचा एकसमान रंग व आकार अपेक्षित आहे. धानामध्ये बुरशी, कीड, दुर्गंधी, अपायकारक पदार्थ तसेच मेक्सिकन पॉपी व खेसारी यांसारख्या अशुद्धी नसाव्यात. ग्रेड ‘अ’ धानासाठी दाण्यांचे लांबी-रुंदी गुणोत्तर 2.5 किंवा त्यापेक्षा अधिक, तर सामान्य श्रेणीसाठी ते 2.5 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. धानातील आर्द्रतेचे प्रमाण कमाल 17 टक्के असावे.

तांदळासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत असल्यास मूल्यकपात केली जाणार नाही. 14 ते 15 टक्के आर्द्रता असल्यास नियमानुसार मूल्यकपात करून खरेदी केली जाईल. 15 टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला तांदूळ स्वीकारला जाणार नाही. तांदूळ स्वच्छ, कोरडा व मानवी वापरासाठी सुरक्षित असणे आवश्यक आहे.

ज्वारीसाठी आर्द्रतेची कमाल मर्यादा 13 टक्के, मक्यासाठी 14 टक्के आणि दुय्यम तृणधान्यांसाठी 13 टक्के निश्चित करण्यात आली आहे. तसेच परकीय पदार्थ, अन्य अन्नधान्य, खराब व रंग बदललेले दाणे याबाबतही शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.

धान्याची गुणवत्ता तपासणी, नमुना घेणे व विश्लेषण भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) निर्धारित मानकांनुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी धान्याची योग्य प्रकारे स्वच्छता व वाळवणूक करून घ्यावी.

जिल्ह्यात तीन तालुक्यांत शासकीय खरेदी केंद्रे

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड व किनवट या तीन तालुक्यांमध्ये शासकीय धान्य खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे.

बिलोली तालुक्यासाठी बिलोली तालुका खरेदी-विक्री संघ, कासराळी, मुखेड तालुक्यासाठी बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था, बेरळी खु. ही खरेदी केंद्रे मार्केटींग फेडरेशन जिल्हा कार्यालय, नांदेड यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहेत. तर किनवट तालुक्यासाठी  शासकीय धान्य गोदाम, चिखली, जलधारा, सारखणी हे केंद्र महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक, प्रादेशिक कार्यालय यवतमाळ यांच्या नियंत्रणाखाली असणार आहे.

धान्य खरेदी, गुणवत्ता निकष, वजनमापे, ऑनलाइन नोंदणी व देयकाबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड कार्यालयाशी 02462-232521 या क्रमांकावर किंवा Dsonanded1@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.


Post Views: 104










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *