डफरीन अहवाल, पिकांचे पंचनामे आणि गुन्हेगारीवर कारवाईची मागणी:काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत वाघिणीच्या हल्ल्यांची चौकशीचीही मागणी केली

[ads1]


जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटाचा चौकशी अहवाल लगेच जाहीर करून दोषींवर कडक कारवाई करावी, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच वाघिणीच्या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी ठरवावी, अशा अनेक मागण्यांसाठी काँग्रेसने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून फक्त ५० टक्केच कर्जमाफी दिली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख आणि जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. डफरीनमधील आगीच्या घटनेनंतर संबंधित व्हेंटिलेटर कंपनीच्या उपकरणांची राज्यभर सुरक्षा तपासणी करावी आणि दोष आढळल्यास त्या कंपनीचा पुरवठा लगेच बंद करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. डफरीनमधील स्फोटाच्या घटनेनंतर चौकशी समितीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही अहवाल जाहीर झालेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींना वाचवण्यासाठी हा अहवाल दडपला जात आहे का, अशी चर्चाही सुरू आहे. जिल्ह्यातील पिकांचे लगेच पंचनामे करावेत, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पीक विम्याचा फायदा मिळवून द्यावा, अशी मागणीही काँग्रेसने केली. गेल्या दोन दिवसांत वाघिणीच्या हल्ल्यांवरून वन विभागावर टीका करत, वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. जिल्ह्यात दिवसाढवळ्या खून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यांसारख्या गंभीर घटना घडत असल्याचा आरोप करत काँग्रेसने वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर निशाणा साधला. पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यास नैतिक जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनात शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख, डॉ. रवींद्र वाघमारे, मुकद्दर पठाण, शैलेश गवई, पंकज देशमुख, गजानन देशमुख, कांचनमाला गावंडे, जयश्री वानखडे, श्रीकांत बोंडे, समाधान दहातोंडे, गिरधर राठोड, दीपक पडळकर, सेतू देशमुख, प्रणव गौरखेडे, राहुल येवले, वैभव देशमुख, विपुल भडांगे, भूषण कोकाटे, यशवंत मंगरोळे, वैभव वानखडे, राहुल गवई, प्रवीण मनोहर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *