[ads1]
![]()
पुणे पोलिसांनी गुन्हेगारीच्या सावटात अडकलेल्या बालकांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिमंडळ-३ च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘संवाद परिवर्तन यात्रा’ अंतर्गत आतापर्यंत ७२ विधिसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन पूर्ण झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गुन्हेगारीपासून बालकांना दूर ठेवणे, त्यांच्यातील न्यूनगंड कमी करणे आणि कला, तांत्रिक कौशल्ये तसेच व्यक्तिमत्त्व विकासातून आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी कर्वेनगर येथे ‘संवाद परिवर्तन यात्रा’चे तिसरे सत्र घेण्यात आले. या सत्रात ४८ विधिसंघर्षग्रस्त बालकांनी भाग घेतला. यावेळी मूर्तिकार विवेक खटावकर यांनी बालकांसाठी मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याबद्दल माहिती देत बालकांना मार्गदर्शन केले. लेखक व व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनीही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला. यानंतर बालकांना चिंचवड येथील डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देऊन तांत्रिक व कलात्मक कौशल्यांचा अनुभव देण्यात आला. याआधी सिंहगड किल्ल्यावर ५० बालकांना ट्रेकिंग आणि व्यसनमुक्तीचे समुपदेशनही देण्यात आले होते. शिक्षण, शाळाबाह्य बालकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, व्यसनमुक्ती, राग व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि स्वावलंबन यावर विशेष भर दिला जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, पोलीस उपायुक्त सागर कवडे तसेच परिमंडळ तीनमधील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
[ads2]
गुन्हेगारीच्या वाटेवरील 72 बालकांना पुणे पोलिसांनी दिली नवी दिशा:‘संवाद परिवर्तन यात्रा’तून समुपदेशन; शिक्षण, कौशल्य विकास आणि व्यसनमुक्तीवर भर
















Leave a Reply