[ads1]
![]()
बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पत्नीच्या डान्स क्लास आणि जिमवर कारवाई टाळण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. महेश अंकुश उगले (वय ३६, बक्कल क्रमांक २६३७) असे पकडण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असून विजय नगर परिसरात राहतो. तक्रारदाराच्या पत्नीचा झुंबा डान्स क्लास आणि जिम आहे. या क्लासबद्दल काही नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी उगले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. उगलेने या अर्जाच्या आधारे कारवाई करण्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनुसार, उगलेने यापूर्वीच दोन लाख रुपये स्वीकारले होते. त्यानंतर उर्वरित पाच लाख रुपयांसाठी तो तक्रारदाराकडे वारंवार मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. यामध्ये उगलेने पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे समोर आले. त्यानुसार, ८ सप्टेंबर रोजी बारामतीतील भिगवण रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेजवळ सापळा रचण्यात आला. उगलेने तक्रारदाराकडून पाच लाख रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.
[ads2]
बारामतीत पोलिस हवालदार पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात:डान्स क्लासवर कारवाई टाळण्यासाठी मागितले होते 7 लाख रुपये
















Leave a Reply