संतोष पंडितला महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी न्यायालयीन कोठडी:21 सप्टेंबरपर्यंत कोठडी मंजूर; कोथरूड पोलिसांनी केली होती अटक.

[ads1]


संतोष गजानन पंडित (वय 48) याला महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली. कोथरूड पोलिसांनी त्याला मंगळवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणी सारिका राम कांबळे (वय 36, रा. श्रावणधारा, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडितला 3 सप्टेंबर रोजी पहाटे अटक करण्यात आली होती. त्याला 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अनेक महिलांविषयी सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी केली. तसेच, काही महिला आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तींविषयी अपमानास्पद शब्द वापरून व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संबंधित महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक आयफोन, सिमकार्ड, मोबाईल चित्रिकरणासाठी वापरले जाणारे ट्रायपॉड, कॉलर माइक आणि इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही महिला विनयभंगासह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची तपासणी, सोशल मीडिया खात्यांचा तांत्रिक तपास आणि इतर संभाव्य पीडित व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बचाव पक्षातर्फे ॲड. वाजेद खान बीडकर यांनी बाजू मांडली.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *