‘तुमसे ना हो पायेगा!’ म्हणत शिवसेना रस्त्यावर – VastavNEWSLive.com

[ads1]

नांदेडच्या प्रलंबित विकासकामांवर सरकारला घेरणार; संजय राऊत, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबरला आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने घोषणा करून प्रत्यक्षात कामे अर्धवट ठेवणाऱ्या सरकारविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारला जाणार असून, ‘जवाब देना पडेगा, देना पडेगा… नही तो इस सरकार को जाना पडेगा! या अनुषंगाने दि. ११ सप्टेंबर रोजी शिवसेना नेते खा. संजय राऊत नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संयोजनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांचा हिशेब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे मागितला जाणार असे आज दुपारी १ वाजता नांदेड येथील हॉटेल मिडलँड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, पुरुषोत्तम धोंडगे, धोंडू पाटील व सुनील पाटील कदम यांनी कळवले आहे.

 

नांदेडचा गोदावरी रिव्हरफ्रंट, १८ निजामकालीन पोलीस ठाण्यांचा कायापालट, नांदेड-वाघाळा मलनिःस्सारण व घनकचरा-बायोगॅस प्रकल्प, मराठवाडा मुक्तिसंग्राम माहिती संग्रहालय, लोहा पाणीपुरवठा योजना, बाभळी मध्यम प्रकल्प, उणकेश्वर उच्च पातळी बंधारा, शासकीय कृषी महाविद्यालय, लेंडी सिंचन प्रकल्प, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नांदेड विमानतळ विस्तार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विस्तार, माहूर पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा अनेक घोषणांचा सरकारला विसर पडला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

 

त्याच अनुषंगाने दि. ११ सप्टेंबर रोजी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांचा हिशेब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे मागितला जाणार आहे.

दरम्यान, लोडशेडिंग, व्होल्टेज ड्रॉप आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण असून पिके जगवायची कशी, असा सवाल उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरील ढासळलेल्या पुलाची चौकशी, मेंढला प्रकल्प, कृष्णूर हेलिकॉप्टर प्रकल्प तसेच शेतकरी आत्महत्या आणि हक्काच्या पाण्याचा प्रश्न यावरही सरकारला घेरले जाणार आहे.

 

घोषणांचा पाऊस आणि कामांच्या नावाने ठणठणाट करणाऱ्या सरकारला आता जनतेच्या प्रश्नांपासून पळता येणार नाही. ‘तुमसे ना हो पायेगा’चा नांदेडमधील आवाज सरकारच्या कानावर घालूनच राहू, असा निर्धार नांदेड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावेळी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, महानगरप्रमुख मनोज यादव, पुरुषोत्तम धोंडगे, धोंडू पाटील, जिल्हा प्रवक्ता डॉ. बालाजी पेनुरकर, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सुनपे, विजय कल्याणकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.


Post Views: 91







[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *