सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षिततेसाठी चांदूर रेल्वेच्या शाळांमध्ये जनजागृती:पोलीस विभागाचा उपक्रम; ऑनलाइन गेमिंग व एपीके फाइलपासून सावध राहण्याचे आवाहन

[ads1]


सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, चांदूर रेल्वे पोलीस विभागाने शहरातील विविध शाळांमध्ये सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, अनोळखी व्यक्तींपासून दूर राहणे, मोबाइल गेमिंगचे दुष्परिणाम तसेच बनावट लिंक व एपीके फाइलमुळे होणाऱ्या फसवणुकीबद्दल माहिती दिली. हा जनजागृती उपक्रम चांदूर रेल्वे शहरातील जिजामाता कन्या शाळा, जि.प. माध्यमिक शाळा, सरस्वती प्राथमिक शाळा आणि नगरपरिषद पूर्व नेहरू प्राथमिक शाळा येथे राबवण्यात आला. एपीआय मनीषा सामटकर आणि पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना, लिंकला किंवा फाइलला प्रतिसाद देऊ नये, तसेच वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय, अनोळखी एपीके फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याची खात्री करावी आणि सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असेही पोलिसांनी सांगितले. मोबाइलचा वाढता वापर, ऑनलाइन गेमिंग आणि इंटरनेटमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सायबर जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद व्यवहार लक्षात आल्यास, तात्काळ सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच, सायबर फसवणूक, सिमकार्ड, मोबाइल किंवा दूरसंचाराशी संबंधित तक्रारींसाठी १९४५ वर संपर्क साधण्याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *