Chhagan Bhujbal Opposes Manoj Jarange Demand; Caste Scrutiny Row

[ads1]

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून त्यांनी ‘जात पडताळणी समिती’ कायमची रद्द करण्याची मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आ

.

‘जात पडताळणी समिती रद्द करणे धोक्याचे’

माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या मागणीवर सविस्तर भाष्य केले. “जात पडताळणी समिती रद्द केली, तर कुणीही कोणत्याही जातीत प्रवेश करेल. विशेषतः दलित (SC) आणि आदिवासी (ST) घटकांमध्ये जास्तीत जास्त लोक बोगस प्रमाणपत्रे काढून प्रवेश मिळवतील, कारण तिथे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वात जास्त सुविधा मिळतात.”

“यापूर्वी अनेक लोकांनी बोगस जात प्रमाणपत्रे काढून एसटी प्रवर्गातून नोकऱ्या मिळवल्या होत्या. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टाने अशा हजारो लोकांकडून पैसे वसूल करण्याचे आणि त्यांना कामावरून काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे १५-२० वर्षे काम केलेल्या लोकांवर मोठे संकट आले होते.”

“जर तुमच्याकडे ओबीसी किंवा कुणबी असल्याचे योग्य पुरावे आणि कागदपत्रे असतील, तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतेच. अनेकदा खऱ्या आदिवासी आणि दलितांनाही कागदपत्रांअभावी प्रमाणपत्र मिळताना अडचणी येतात, पण म्हणून समितीच बरखास्त करणे हा उपाय नाही. समिती नसेल तर एससी, एसटी आणि ओबीसींचा काहीही अर्थ उरणार नाही,” असे भुजबळ म्हणाले.

रिक्षाचालकांना मुदतवाढ, ‘भाषा शिकायला वेळ लागतो’

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षाची मुदतवाढ दिली. यावर बोलताना भुजबळ म्हणाले. “जर तुम्ही मुंबईत कायमचे राहायला आणि धंदा करायला आला आहात, तर कामापुरती तरी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आपले लोक जेव्हा तामिळनाडू किंवा गुजरातमध्ये जातात, तेव्हा तेथील भाषा शिकतात आणि बोलतात. पण ही भाषा शिकण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच. मुख्यमंत्र्यांनी दिलेला एक वर्षाचा वेळ योग्यच आहे.”

“या निर्णयाचा येणाऱ्या निवडणुकांशी किंवा मतांच्या राजकारणाशी कोणताही संबंध जोडणे चुकीचे आहे. रिक्षाचालकांचे परवाने रद्द होणार होते, ते स्थगित झाल्यामुळे त्यांनी ढोल-ताशे वाजवून आनंद साजरा केला.”

शरद पवार गटाच्या बैठकीवर भुजबळांची सावध प्रतिक्रिया

दरम्यान, मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू असताना या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किंवा एनडीएला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याच्या प्रश्नावरही भुजबळांना विचारण्यात आले. भुजबळ यांनी या चर्चेबाबत कोणतेही ठोस वक्तव्य केले नाही. एका कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला आपण उपस्थित होतो; मात्र त्याठिकाणी विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार गटाच्या बैठकीत काय चर्चा होते, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहित पवारांच्या गैरहजेरीवरही भुजबळांचा टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवार अनुपस्थित असल्याबाबतही भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. रोहित पवार इतर कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात; मात्र पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला ते उपस्थित नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांच्याशी गेल्या काही दिवसांत आपली चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचे कारण त्यांनाच विचारावे, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबईच्या महापौरपदावर भुजबळांची भूमिका

मुंबईच्या महापौरपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबाबतही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या मुंबईत भाजपचा महापौर आहे. पुढील काळात शिंदे गटाचा महापौर असावा, अशी इच्छा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली असेल, तर इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असे भुजबळ म्हणाले. मात्र महायुतीतील सर्व पक्ष एकत्र काम करत असून महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय एकत्रितपणे घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच होणार का, हा प्रश्न सध्या कायम आहे.

नाशिक कुंभमेळ्यातील कथित बोगस भरतीवर कठोर कारवाईचे आश्वासन

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून कथित बोगस भरतीचे रॅकेट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. कुंभमेळ्याच्या नावाखाली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक केली जात असेल, तर हा गंभीर प्रकार आहे. बोगस भरती किंवा रॅकेट असल्याचे निष्पन्न झाल्यास पोलीस यंत्रणा त्याचा पूर्ण तपास करून दोषींना कायद्यासमोर उभे करेल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करण्याऐवजी जे काही बोगस आहे ते उघडकीस आणणे आणि संबंधितांवर कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे भुजबळ म्हणाले.

नेपाळमधील संकटावरही चिंता

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबतही भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या संख्येने लोक या संकटामुळे प्रभावित झाले असून भारतातील तसेच अन्य ठिकाणचे नागरिकही तिथे अडकले असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी वीज, दळणवळण आणि दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्यामुळे अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधणेही कठीण होत असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांनी सुरक्षितपणे आपल्या घरी परतावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…

मनोज जरांगेंचा 58 लाख नोंदींचा दावा हास्यास्पद!:फायदा केवळ 15 हजारांनाच’; बबनराव तायवाडेंनी मांडली आकडेवारी, जरांगेंवर दिशाभूल केल्याचा आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र (Validity) मिळावे, या मागणीसाठी आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि हास्यास्पद असल्याचे सांगत, अधिकृत आकडेवारी मांडून जरांगेंवर जोरदार पलटवार केला आहे. “जरांगे 58 लाखांचा आकडा सांगून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांची दिशाभूल करत आहेत,” असा थेट आरोप तायवाडे यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

OBC आरक्षण संपलेय, आता तरी जागे व्हा!:लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले- रोहित पवारांकडेही ओबीसीचा दाखला

“मनोज जरांगे यांचे आंदोलन मराठा समाजातील गरिबांसाठी नसून, सत्तेतील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांची बोगस कुणबी प्रमाणपत्रे वैध (Valid) करून घेण्यासाठी आहे. ‘कुणबीचा दाखला म्हणजेच मागासवर्गीय’ हा शासनाचा बेकायदेशीर जीआर ओबीसींच्या आरक्षणात माती कालवणार असून महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण आता संपले आहे,” असा अत्यंत गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी दौंड येथून मुंबईकडे ‘संघर्ष यात्रा’ काढणार असून या दिवशी मुंबई आणि पुणे ठप्प करू, असा कडक इशाराही त्यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी

मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू: म्हणाले- सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही; इथं तोडगा निघाला नाही तर मुंबई गाठणार!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *